Home /News /mumbai /

EXCLUSIVE : फुल जल्लोषात भाजपकडून आमदारांचं स्वागत, ताज प्रेसिडेंट हॉटेलमधील आतले VIDEO समोर

EXCLUSIVE : फुल जल्लोषात भाजपकडून आमदारांचं स्वागत, ताज प्रेसिडेंट हॉटेलमधील आतले VIDEO समोर

शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आज रात्री नऊ वाजेच्या सुमारास ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांचे भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

    मुंबई, 2 जुलै : शिवसेनेचे बंडखोर आमदार (Shiv Sena Rebel MLAs) मुंबईत दाखल झाले आहेत. या सर्व आमदारांची मुंबईतील नामांकित अशा फाईव्ह स्टार ताजच प्रेसिडेंट हॉटेलमध्ये (Mumbai Taj Hotel) सध्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व आमदारांचा आजचा मुक्काम हा याच हॉटेलमध्ये असणार आहे. सर्व आमदार आज रात्री नऊ वाजेच्या सुमारास ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांचे भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गिरीश महाजन, राम कदम हे शिवसेनेच्या आमदारांच्या स्वागतासाठी हॉटेलमध्ये प्रवेशद्वारावर उभे होते. भाजप नेत्यांनी सर्व आमदारांचे हसत-खेळत स्वागत केले. विशेष म्हणजे 'काय झाडी, काय डोंगर काय हाटिल' या डायलॉगसाठी फेममध्ये आलेले आमदार शहाजी बापू पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना यावेळी नमस्कार केला. शहाजी बापूंचं स्वागत करताना भाजप नेते खूप खूश झालेले बघायला मिळाले. दरम्यान, शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर आमदार आज दुपारी साडेचार वाजता गोव्याहून मुंबईच्या (Mumbai) दिशेला रवाना झाले होते. गोव्याच्या ताज हॉटेलमधून आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची बस विमानतळाच्या दिशेला रवाना झाली होती. त्यानंतर ते विमानतळात दाखल झाले. या सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील होते. सर्व आमदार विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते विमानात बसले आणि मुंबईच्या दिशेला रवाना झाले. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. या आमदारांच्या विमानात बसतानाचा पहिला व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत आमदार विमानात आसनस्थ होताना दिसत आहेत. त्यानंतर या आमदारांचा मुंबई विमानतळावरुन ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला जाणारा व्हिडीओ समोर आला होता. (एकनाथ शिंदेंनी शेवटपर्यंत आमदारांची सोडली नाही साथ, मुख्यमंत्री झाल्यानंतरही सर्वात पुढे) शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे शिष्ठमंडळ मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. यामध्ये आमदार प्रसाद लाड यांचादेखील समावेश होता. विमानतळाबाहेर पाच बस उभ्या होत्या. या सर्व बसमध्ये भाजपचे आमदार होते. शिंदे गटाच्या आमदारांना घेऊन या पाचही बस ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला रवाना झाल्या. ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. फडणवीस सर्व 168 आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते उद्याच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना देणार आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या