Home /News /mumbai /

फडणवीस-राऊत भेटीमागील नेमकं कारण काय? प्रवीण दरेकरांनी केला महत्त्वाचा खुलासा

फडणवीस-राऊत भेटीमागील नेमकं कारण काय? प्रवीण दरेकरांनी केला महत्त्वाचा खुलासा

या भेटीबाबत भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खुलासा केला आहे.

    मुंबई, 26 सप्टेंबर : शिवसेना नेते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत बीकेसीमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली आहे. यावेळी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. तसंच भविष्यातील नव्या समीकरणांची ही नांदी आहे का, असंही बोललं जाऊ लागलं. मात्र आता या भेटीबाबत भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खुलासा केला आहे. 'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी 'सामना' दैनिकासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही,' अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. राजकीय वर्तुळात चर्चेला आला होता ऊत संजय राऊत हे वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात टीका करत असताना देखील ही भेट झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारविरोधात टीका होत आहे. तसंच बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतरही ठाकरे सरकारची कोंडी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने काही राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत का, अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र आता प्रवीण दरेकरांनी या भेटीबाबत खुलासा केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Pravin darekar, Sanjay raut

    पुढील बातम्या