मुंबई, 30 ऑक्टोबर : 'एसटीच्या मालमत्ता गहाण ठेऊन एसटीसाठी कर्ज उभारायचे हा प्रकार महाराष्ट्राला शोभादायक नाही. एसटीसाठी जर कर्ज घ्यायचे असेल तर राज्य सरकारची कर्ज घेण्याची क्षमता आहे, त्यामाध्यमातून राज्य सरकारने कर्ज घेऊन बॉंड निर्माण करावेत व एसटीचा कारभार चालवावा पण एसटीची कुठलीही मालमत्ता गहाण ठेऊन पैसे उभारणे योग्य नाही,' अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
एसटी महामंडळ दोन हजार कोटीचे कर्ज घेऊन कर्मचा-यांचे 900 कोटीचे थकीत पगार आणि एसटीसाठी इतर व्यवस्था करण्याच्या हेतूने कर्ज घेण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केल्याची चर्चा आहे. त्याबद्दल बोलनाता दरेकर म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची नक्कीच आवश्यकता आहे. सध्या सरकारला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. परंतु सरकारला मंत्रालयातील शासकीय कर्मचा-यांना पगार द्यायचे असेल तर तुम्ही मंत्रालय गहाण ठेवणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्य सरकार म्हणून महामंडळांनी पैसे उभारण्यापेक्षा सरकारने पैसे उभे करून एसटीला आर्थिस आधार देण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षांनी एसटी 'कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराविषयी आग्रही भूमिका घेतल्यामुळेचे एक महिन्याचा पगार कर्मचा-यांना देण्यात आला. त्यांचे तीन महिन्याचे पगार अदयापही द्यायचे आहेत. दिवाळी तोंडावर आहे अशा वेळेला पैसे उभे करणे गरजेचे आहे. पण कर्जाच्या माध्यमातून खाजगीकरणाचा तर डाव नाही ना. उद्या आपण मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभे केल्यास एसटी महामंडळ कर्जबाजारी होईल. कुणीतरी खासगी कंपनीने एसटी महामंडळ ताब्यात घ्यावी हा हेतू तर यामागे नाही ना?' अशी भीतीही दरेकर यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.