उद्धव ठाकरे दुतोंडी माणूस.. नाणारला आधी विरोध, आता छापली जाहिरात, राणेंचा 'प्रहार'

उद्धव ठाकरे दुतोंडी माणूस.. नाणारला आधी विरोध, आता छापली जाहिरात, राणेंचा 'प्रहार'

हे सरकार गेल्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेला चांगले दिवस येणार नाहीत, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे.

  • Share this:

मुंबई,17 फेब्रुवारी:कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहिरात 'सामना' या शिवसेनेच्या मुख्यपत्रात प्रकाशित झाल्याने शिवसेनेवर चौफेर टीका होत आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची भर पडली आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

नाणार प्रकल्पाबाबत मुंबईत माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सोबतच शिवसेनेवरही टीका केली. राणे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसारखा दिशाभूल करणारा माणूस नाही. आधी नाणारला विरोध केला आता जाहिरात छापली. उद्धव ठाकरे दुतोंडी माणूस, अशा शब्दांत राणे यांनी घणाघाती प्रहार केला आहे. हे सरकार चालत नाही आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनासह मंत्रालयात सगळीकडे भ्रष्टाचाराची दुकानं चालतायत. सर्व कामाना स्थगिती देत आहे. हे सरकार गेल्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेला चांगले दिवस येणार नाहीत, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे.

भाजपची जी भूमिका तिच माझी भूमिका..

कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत भाजपची जी भूमिका असेल तिच माझी भूमिका असणार आहे, अशी भूमिका नारायण राणे यांनी घेतली आहे. नाणारबाबत शिवसेनेला स्वत:ची कोणतीही भूमिका नाही. शिवसेना नेहमी भूमिका बदलत आलेली आहे. आता सुद्धा नाणारबाबत त्यांनी भूमिका बदलली. हे सरकार गेल्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेला चांगले दिवस येणार नाहीत.

दरम्यान, ज्या शिवसेनेने गावकऱ्यांच्या प्रखर विरोधामुळे नाणार रिफायनरीच्या जमीन संपादनाची अधिसूचना रद्द करायला लावली. त्याच शिवसेनेच्या मुखपत्रात रिफायनरी संबंधी जाहिरात येतेच कशी असा संतप्त सवाल विचारत कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितिने मुंबईतल्या सामना कार्यालयावर धडक देत बिनशर्त दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी या रिफायनरीचे समर्थन केल्यामुळे महाविकास आघाडीतले मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत.

काय आहे हे जाहिरात प्रकरण?

'सामना'च्या 15 फेब्रुवारीच्या अंकात पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी कंपनीची म्हणजेच RRPCLची अर्ध पान रंगीत जाहिरात प्रकाशित झाली. यावरून कोकणात एकच चर्चा सुरु झाली. ज्या शिवसेनेने नाणार रिफायनरीला विरोध करुन विधानसभा निवडणुकांआधी हा प्रकल्प रद्द करुन घेतला. त्याच शिवसेनेने सत्तेत आल्यावर प्रकल्पाचे समर्थन करण्याची भूमिका जाहिरात छापून घेतलीय का? असे प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारले जात आहेत. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की सामना हे शिवसेनेचे मुखपत्र जरी असले तरी ते एक वृत्तपत्र आहे. त्यामुळे इतर जाहिराती जशा छापल्या जातात तशीच ही जाहीरात छापण्यात आली असावी. मात्र, ही जाहिरात छापली गेली असली तरी हा प्रकल्प महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी रिफायनरी कंपनी कितीही मनात मांडे खात असली तरी हा प्रकल्प कोकणात होणार नाही. पण सामनात ही जाहिरात छापून आल्यामुळे रिफायनरीविरोधी कृति समितिने तीव्र नाराजी व्यक्त करत सामनाच्या मुंबईतील कार्यालयावर धडक दिली. रिफायनरीविरोधी कृति समितिचे जवळपास वीस ते पंचवीस कार्यकर्ते सामनाच्या कार्यालयात गेले आणि त्यानी निवेदन देत या जाहिरातीबाबत बिनशर्त दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. ही दिलगिरी सामनाने नाही व्यक्त केली तर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेउन त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवू, असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

महाविकास आघाडीत मतभेद

सामनामध्ये रिफायनरीची जाहीरात छापून आल्यावर खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांना सामोरे जात कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नसल्याची शिवसेनेची भूमिका असल्याचे निक्षून सांगितलं. मात्र, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तट्करे यानी एव्हढा मोठ्या गुंतवणुकीचा प्रकल्प महाराष्ट्रात, पर्यायाने कोकणात झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. इतकंच नाही तर रिफायनरी करण्याबाबत मुख्यमंत्र्याना सर्व पक्षाना विश्वासात घेउन लवकरात लवकर निर्णय करावाच लागेल असंही म्हटलं आहे. त्यामुळे रिफायनरीवरुन महाविकास आघाडीत परस्पर विरोधी भूमिका असल्याचे समोर आलं आहे. विशेष म्हणजे नाणार रिफायनरीची अधिसूचना रद्द केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा रायगड जिल्ह्यात होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यादृष्टीने तत्कालीन राज्यसरकारने गेल्या वर्षी सिडकोच्या माध्यमातून इंडस्ट्रीयल टाऊनशिपसाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जारी केली होती. याच अधिसूचनेला सुनील तटकरे आणि रायगडमधल्या राष्ट्रवादीच्या नेत्यानी पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास तटकरे यांचं समर्थन असल्याचं यापूर्वीच स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रिफायनरीबाबतचा निर्णय घेण्यात कसोटी लागणार आहे.

First published: February 17, 2020, 6:41 PM IST

ताज्या बातम्या