सोनिया, राहुल यांनी किती योगदान दिलं, ते आधी सांगा; भाजपचा खणखणीत सवाल

सोनिया, राहुल यांनी किती योगदान दिलं, ते आधी सांगा; भाजपचा खणखणीत सवाल

भाजपचे राज्यातील पदाधिकारी या संकटात जनतेला मदत करण्यासाठी पक्षाच्या आपत्ती कोषामध्ये निधी जमा करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 31 मार्च: कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी भाजपच्या गांभीर्याची चौकशी करणाऱ्या काँग्रेसने आधी त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी उभारलेल्या राष्ट्रीय निधीमध्ये किती योगदान दिले याची माहिती द्यावी, असा खणखणीत सवाल भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला.

माधव भंडारी म्हणाले की, भाजपचे राज्यातील पदाधिकारी या संकटात जनतेला मदत करण्यासाठी पक्षाच्या आपत्ती कोषामध्ये निधी जमा करत आहेत. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभारलेल्या राष्ट्रीय निधीतही भाजपचे नेते, कार्यकर्ते योगदान देत आहेत आणि त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करत आहेत.

हेही वाचा.. कोरोनाविरोधातील लढ्याच्या निर्णायक टप्प्यात, शिस्त मोडू नका; आपण जिंकणारच- CM

सरकारकडून मिळालेले वेतन सरकारी मदतनिधीतच जमा केले पाहिजे, ही काँग्रेसची मागणी आश्चर्यकारक आहे. यापूर्वी शिवसेनेने पूरग्रस्तांना मदत म्हणून त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आपले वेतन त्या पक्षाच्या कोषात जमा करण्याची सूचना केली होती. त्याविषयी काय म्हणायचे आहे, हे काँग्रेस पक्षाने आधी सांगावे, असंही भांडारी यांनी म्हटलं आहे. सरकारकडून वेतन मिळाले तरी ते मिळाल्यानंतर त्याचा कसा विनियोग करायचा हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. शिवाय भाजपचे लोकप्रतिनिधी हे वेतन कोरोनाविरोधी लढ्यातील सेवाकार्यासाठीच पक्षाकडे देत आहेत, याची नोंद घ्यावी.

भाजप अनेक राज्यात मोदींच्या नावाने मदत देण्याचे काम करत आहे. गरीब लोकांना गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी 'मोदीकीट' बनवून त्यावर मोदींचा फोटो लावला जात आहे, अशी टीका काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात केली आहे. आपण त्याचे स्वागत करतो कारण त्या निमित्ताने भाजप मदत कार्य करत असल्याचे मान्य केले, असा टोला भंडारी यांनी लगावला.

हेही वाचा...VIDEO कोरोनामुळे घरात बंद असताना प्रेयसीला भेटण्यासाठी तरूणाची भन्नाट शक्कल

भंडारी यांनी सांगितलं की, भाजपाला कोरोनाच्या संकटाचे पूर्ण गांभीर्य आहे म्हणूनच पक्षाचे राज्यातील सव्वालाख कार्यकर्ते दररोज सेवा कार्य करत आहेत. पक्षाच्या सहाशे मंडलांमध्ये सक्रीयतेने नागरिकांना मदत केली जात आहे. वीस लाख गरजू लोकांना जेवण किंवा शिधा देण्यासाठी पक्षाने पुढाकार घेतला असून प्रभावी काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष नेमके काय करत आहे हे सांगावे.

ते म्हणाले की, या संकटकाळात सर्वांनी एकजूट करावी हीच भाजपची भूमिका आहे त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या प्रसंगात राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करावे असा, आदेश काढला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या प्रसंगात सरकारवर टीका करण्याऐवजी संकटातून कसा मार्ग काढावा यासाठी उपयुक्त सूचना करत आहेत. सध्या राज्यातील सरकार हा प्रश्न ज्या पद्धतीने हाताळत आहे ते ध्यानात घेता विरोधी पक्ष म्हणून बोलण्यासारखे आणि सवाल उपस्थित करण्यासारखे अनेक मुद्दे आहेत. परंतु आम्ही जाणीवपूर्वक टीका टाळतो, कारण समाजावर गंभीर संकट असताना प्रशासनाला अडचणीत आणणे ही आमची संस्कृती नाही, अशा शब्दात माधव भंडारी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

First published: March 31, 2020, 10:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading