फोन टॅपिंग: एकनाथ खडसेंचा 'महाआघाडी'ला पाठिंबा? मध्यावधीबाबत केला दावा

फोन टॅपिंग: एकनाथ खडसेंचा 'महाआघाडी'ला पाठिंबा? मध्यावधीबाबत केला दावा

भाजप सरकारच्या काळात अशा घटना घडल्या असतील तर दुर्देव असल्याचे सांगत खडसेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई,6 फेब्रुवारी: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही फोन टॅपिंगच्या चौकशीची मागणी केली आहे. भाजप सरकारच्या काळात अशा घटना घडल्या असतील तर दुर्देव असल्याचे सांगत खडसेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्यातल्या महाआघाडीत तीन पक्ष सहभागी असल्याने कुरबुरी सुरूच असतात. कधी, आवडतं खातं, कधी बंगले तर कधी मुद्यांवरून कुरघोडी सुरू असते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावरून उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. आम्ही सरकार पडावं म्हणून काही वाट पाहात बसलेलो नाही. हे सरकार आपसातल्या वादामुळेच कोसळणार आहे. त्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सावध राहिलं पाहिजे. असं झालच तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असं भाकितही त्यांनी व्यक्त केल आहे. मात्र पुढील काही महिने तरी महाराष्ट्रात निवडणूका लागणार नाहीत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

फडणवीस दिल्लीत गेल्यास आनंदच..

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असेल तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याचेही समजते.

देवेंद्र फडणवीस हे आपले सहकारी असून ते केंद्रात मंत्री होणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. दिल्लीने एकदा सांगितलं की केंद्रात येण्याचा मार्ग सुकर होतो, पक्षाचा आदेश अंतिम असतो, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले. आपल्या बरोबर काम करणारा नेता जर केंद्रीय मंत्रिमंडळात असेल, तर महाराष्ट्राला त्याचा चांगला उपयोग करुन घेता येईल. त्याबाबत मला समाधानच वाटेल. वरिष्ठांना जर वाटलं, किंवा केंद्रीय नेतृत्त्वाने जर आदेश दिले तर ते केंद्रामध्ये जाऊ शकतील, असेही खडसेंनी सांगितले.

First published: February 6, 2020, 6:28 PM IST

ताज्या बातम्या