Home /News /mumbai /

ओहोटी संपल्यानंतर भरती येते, खडसेंचं वेलकम करत रोहित पवारांचा भाजपला टोला

ओहोटी संपल्यानंतर भरती येते, खडसेंचं वेलकम करत रोहित पवारांचा भाजपला टोला

भाजपने मेगाभरती करून राष्ट्रवादीचे खासदार आणि आमदार गळाला लावले होते. रोहित पवार यांनी या मेगाभरतीची आता खिल्ली उडवली आहे.

    मुंबई, 21 ऑक्टोबर : एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. एकनाथ खडसे यांच्या घोषणेमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खडसेंचं स्वागत भाजपला सणसणीत टोला लगावला आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने मेगाभरती करून  राष्ट्रवादीचे खासदार आणि आमदार गळाला लावले होते. रोहित पवार यांनी या मेगाभरतीची आता खिल्ली उडवली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली', अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते, वेलकम खडसे साहेब' असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे. त्याआधी आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. 'भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचं आम्ही पक्षात स्वागत करत आहोत. शुक्रवारी दुपारी 2 वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी घोषणा पाटील यांनी केली. 'भारतीय जनता पक्षाचे गेले तीन ते साडेतीन दशक नेतृत्व करणारे नेते, आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले आहे. त्यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. 'देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडतोय' भाजप पक्ष सोडण्याचे एकमेव कारण म्हणजे, देवेंद्र फडणवीस हेच आहे. त्यांच्यामुळे आपण पक्ष सोडत आहोत. ते जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला होता. पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून  गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट खडसेंनी केला. 'खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मी फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा, नाईलाजाने तक्रार दाखल करावी लागली, असं उत्तर फडणवीस यांनी दिले. ते तपास करून तक्रार दाखल करा, असं सांगू शकत होते. पण, अत्यंत खालच्या स्ताराचे राजकारण करण्यात आले, अशी टीकाही खडसेंनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या