राष्ट्रपती राजवटीबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, शरद पवारांच्या टीकेलाही सडेतोड उत्तर

राष्ट्रपती राजवटीबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, शरद पवारांच्या टीकेलाही सडेतोड उत्तर

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 मे : राज्यात राष्ट्रपती राजवटीसाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं होतं. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली आहेत. तसंच राष्ट्रपती राजवटीबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली.

'पहिल्यांदा सुब्रमण्यम स्वामींनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. त्यानंतर नारायण राणे यांनी ही मागणी केली. राणेसाहेब अन्याय सहन करू शकत नाहीत, त्यामुळे ते थेट बोलतात. राज्यातील स्थिती पाहून त्यांनी ती मागणी केली. पण महाराष्ट्रातील स्थिती पाहता आम्हाला राजकारण करण्यात रस नाही. आम्हाला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची कोणतीही घाई नाही,' असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शरद पवारांना उत्तर

'काँग्रेसचे नेते एक बोलतात तर राष्ट्रवादीचे नेते दुसरंच बोलतात. त्यामुळे सरकारमध्ये समन्वय नसल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी जे म्हटलंय की भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यावर आमचं म्हणणं आहे की आम्हाला सरकार स्थापन करण्याची कोणतीही घाई नाही. आम्हाला सरकारला घालवायचं नाही तर जागं करायचं आहे,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांची कामगिरी कशी आहे?

'राज्य सरकार केंद्रातून आलेले पैसे खर्च करताना दिसत नाहीये. मार्च महिन्याच्या शेवटच्या काळात खर्च झालेले पैसे पाहिले तर आपल्याला कळेल की सरकारचा प्राधान्यक्रम आहे. मी उद्धवजींचं मूल्यमापन करण्यासाठी इथं बसलेलो नाही...तो माझा अधिकारही नाही...पण राज्याला सध्या एका आश्वासक नेतृत्वाची गरज आहे. आम्हाला त्यांच्याकडून ठोस निर्णयांची अपेक्षा आहे,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रावर अन्याय नाही

'केंद्र सरकार महाराष्ट्राला काही देत नाही, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे केंद्राने राज्याला आत्तापर्यंत कोणती मदत केली, त्याबाबत मी सविस्तर माहिती देत आहे. गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत मोठी मदत करण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनाही आर्थिक मदत करण्यात आली. अशा विविध योजनांतून केंद्राने महाराष्ट्राला हजारो कोटींची मदत केली आहे,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

कोरोना लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं