अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयांचं चंद्रकात पाटलांनी केलं स्वागत

अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयांचं चंद्रकात पाटलांनी केलं स्वागत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जो निर्णय झाला, त्याचं भाजपने स्वागत केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वारीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कोरोनाचे संकट ध्यानात घेता पंढरपूरची सात पालख्यांची आषाढी एकादशीची वारी यंदा वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने करून वारीची शेकडो वर्षांची परंपरा चालू ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. वारकऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे तसेच कोरोनाचे संकट ध्यानात घेऊन पंढरपूर येथे न जाता आपापल्या घरीच विठ्ठलाची पूजा करावी, असेही आवाहन पाटील यांनी केले.

'विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वारकरी संप्रदायातील प्रमुखांसोबत पंढरपूरची आषाढीची वारी चालू ठेवण्याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली होती. ज्ञानेश्वर, तुकाराम, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ व नामदेव अशा सात संतांच्या पालख्या पंढरपूरला आषाढीसाठी जातात. ही शेकडो वर्षांची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित होऊ नये. परंतु त्याच वेळी या साथीच्या रोगाला कोणी बळी पडू नये, असा विचार झाला. त्यातून तीन पर्याय सुचविण्यात आले. निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत नेहेमीप्रमाणे पालख्या नेण्यात याव्यात किंवा वाहनाने पालख्या नेण्यात याव्यात किंवा हेलिकॉप्टरने पादुका नेण्यात याव्यात असे तीन पर्याय मांडण्यात आले. प्रशासनाने आज वाहन किंवा हेलिकॉप्टर हे दोन पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वारीची परंपरा खंडीत होणे टाळले जाईल व त्याचबरोबर कोरोनापासूनही बचाव केला जाईल. भाजपा प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करते,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेकडो वर्षांच्या वारीच्या परंपरेबद्दल समाजात मोठी आस्था आहे. वारीची ओढ वाटणे स्वाभाविक आहे. परंतु यंदा कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाचे सर्व नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन आपण सर्व वारकऱ्यांना करतो. आषाढीसाठी पंढरपूरला दरवर्षी लाखो लोकांनी जाण्याची परंपरा यंदा बाजूला ठेऊन आपण सर्वांनी घरीच विठ्ठलाची पूजा करून आषाढी एकादशी साजरी करणे गरजेचे आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 29, 2020, 11:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading