'पक्ष सोडण्याआधी एकनाथ खडसेंसोबत चर्चा झाली, पण...'; चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

'पक्ष सोडण्याआधी एकनाथ खडसेंसोबत चर्चा झाली, पण...'; चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडण्याचं कारण सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपण पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील गावा-गावात भाजपच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. मात्र खडसे यांनी पक्ष सोडण्यापूर्वी आपण त्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

'नाथाभाऊ यांचा राजीनामा माझ्या हातावर ठेवण्यात आला. आम्हाला असं वाटलं होतं की ते चिडतील पण पक्षातच राहतील. आम्ही सगळे प्रयत्न केले. पण सगळे प्रयत्न यशस्वी होतात, असं नाही. आम्ही त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्यांचं मत तयार केलं असावं. माझा आणि नाथाभाऊंचा संवाद चांगला होता. त्यामुळे माझ्यावर त्यांच्याशी बोलण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी आमचं म्हणणं मान्य केलं नाही.' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांबद्दलचा आरोप आणि चंद्रकांत पाटलांचं उत्तर

गेल्या अनेक दिवसांपासून नाराजी व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी वारंवार माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'त्यांनी ज्या ज्या मुद्यावर आक्षेप घेतला, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर चर्चा केली आणि माहिती दिली आहे. तरीही ते त्यांचे मुद्दे मांडत राहिले आहेत.'

'देवेंद्र फडणवीसांनी माझं आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला'

भाजपला सोडचिठ्ठी देताना एकनाथ खडसे काहीसे भावुक झालेले पाहायला मिळाले. मात्र त्याचवेळी त्यांनी भाजप सोडण्याचं कारण सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. 'देवेंद्र फडणवीसांनी माझे राजकीय आयुष्य उद्धवस्त केल्यामुळेच भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. पक्षावर व कार्यकारणीवर मी नाराज नाही. परंतु देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रमाणे माझी राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी चार वर्ष मानसीक तणावाखाली घालवली,' अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपला संताप व्यक्त केला.

Published by: Akshay Shitole
First published: October 21, 2020, 4:01 PM IST

ताज्या बातम्या