'झुकली रे झुकली.. मराठी बाणा सांगणारी शिवसेना काँग्रेससमोर झुकली'

'झुकली रे झुकली.. मराठी बाणा सांगणारी शिवसेना काँग्रेससमोर झुकली'

छे..छे..झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!

  • Share this:

मुंबई,15 डिसेंबर: भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने काॅंग्रेससोबत सत्तेत आलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकली, असे ट्वीट करता आशिष शेलार यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.

"नाही धार "सच्चाई"कारांच्या शब्दांना आज दिसली "रोखठोक"लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली? छे..छे..झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!" असे ट्वीट आशिष शेलारांनी केले.

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधींना जोडे मारावेत'

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरात राहुल गांधी यांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध केला जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी तिव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. 'उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधींना जोडे मारावेत', असेही रणजित सावरकर यांनी म्हटले आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी खडेबोल सुनावले आहे. 'आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. 'सुज्ञांस अधिक सांगणे न लगे', अशा शब्दात संजय राऊत यांनी राहुल गांधींचे कान टोचले आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महाविकासआघाडीमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहे.

रणजित सावरकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे दैवत आहे. मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही, असे म्हणणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे. राहुल गांधी यांच्या वादग्रस्त विधानावर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रणजित सावरकर म्हणाले, 'ही चांगली गोष्ट आहे की, त्यांचे नाव राहुल सावरकर नाही. त्यांचे नाव सावरकर असते, तर आम्हाला तोंड काळे करावे लागले असते. राहुल गांधी यांनी आजी इंदिरा गांधी यांचे त्यांच्या नावातून 'नेहरु' काढल्याबद्दल आभार मानले पाहिजेत. कारण त्यांचे आधीचे नाव इंदिरा गांधी-नेहरू होते. देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधीच सत्तेच्या मोहाने नेहरूजींनी व्हॉईसराय मंडळाचे सदस्य बनण्यासाठी 'भारताचे सम्राट किंग जॉर्ज (सहावे) आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. स्वा. सावरकरांनी असे घृणास्पद कृत्य करण्याचा स्वप्नात देखील विचार केला नसता.

ही गुलामीची शपथ नेहरूजींनी इतक्या निष्ठेने निभावली की, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यावरही ते 1950 पर्यंत किंग जॉर्ज लाच भारताचा सम्राट मानत होते. सर्व महत्त्वपूर्ण निर्णय घेताना त्यांची अनुमती घेत होते. मार्च 1948 मध्ये जेव्हा राजाजी यांना गव्हर्नर जनरल बनवले. तेव्हाही किंग जॉर्ज यांची अनुमती घेतली होती., असे लोकच स्वा. सावरकर यांच्यासारख्या देशभक्ताचा अपमान करू शकतात.

उल्लेखनीय आहे की, स्वा. सावरकर यांच्या अंत्ययात्रेसाठी सरकारने तोफगाडा देण्यास नकार दिला होता, पण जेव्हा नेहरूजींची प्रिय मित्र, लेडी माउन्टबॅटन यांचा मृत्यू झाला. तेव्हा कोणीही न मागताच भारतीय नौदलाची युद्धनौका 'त्रिशूल' तिथे पाठवली होती. हा देश काय कोणाची जहागीर आहे? आता ही स्वातंत्र्यपूर्व काळातील देशभक्त काँग्रेस राहिली नाही, हा तर एका गुलाम वंशाचा पक्ष झाला आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 03:35 PM IST

ताज्या बातम्या