सरकारकडून मुंबईकरांचा जीव धोक्यात घालण्याचं काम, भाजपचा घणाघाती आरोप

सरकारकडून मुंबईकरांचा जीव धोक्यात घालण्याचं काम, भाजपचा घणाघाती आरोप

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 7 जून : मुंबईतील नालेसफाईची कामे यावर्षी40 टक्केच पूर्ण झाली आहेत, त्यामुळे मुंबई महापालिका डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात आलेल्या गाळाची आकडेवारी जाहीर करीत नाही, असे चित्र सध्या मुंबईत आहे,' असं म्हणत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

मुबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपा आमदार, नगरसेवक यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्यासह गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, प्रभारी भालचंद्र शिरसाट, आदींचा समावेश होता.

आज जूहू येथील, गझदरबांध नाला, एस एन डी टी नाला, सांताक्रूझ गझदरबांध पंपिंग स्टेशन, गोरेगावची वाळभाट नदी, भांडूपचा शाम नगर नाला, घाटकोपरचा सोमय्या नाला, चेंबूरचा पिडब्लुडी एम एम आरडी ए नाला आदी नाल्यांची पाहणी करण्यात आली.

'यावर्षी 40 टक्केच काम पूर्ण झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी गाळ नाल्यातच आहे. काही ठिकाणी नाल्याच्या बाजूला गाळ पडून आहे. गाळ अजून उचलेला नाही. त्यामुळे महापालिकेने गेल्यावर्षी आणि यावर्षीचे नाल्याच्या गाळाच्या वजनाची आकडेवारी घोषित करावी. कंत्राटदाराला जास्त मनुष्य बळ उपलब्ध करायला अडचणी आल्या का ते सांगा, यावर्षी डंपिंग वर किती गाळ टाकला ते घोषित करा, लपवाछपवी करुन मुंबईकरांचा जीव धोक्यात घालू नका,' असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला आहे.

आमदार पराग शाह, नगरसेवक अनिष मकवानी, हेतल गाला, स्वप्ना म्हात्रे, प्रिती साटम, आशा मराठे, जागृती पाटील यांच्यासह त्या त्या विभागात भाजपा नगरसेवक ही या दौऱ्यात सहभागी झाले होते.

'सत्ताधारी आणि प्रशासनाकडून मुंबईकरांचे जीव धोक्यात घालण्याचे काम'

मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुंबईतील नालेसफाईची 40 टक्केपेक्षा जास्त कामे झालेली नाहीत. आम्ही ही बाब प्रशासनाला सांगू इच्छितो, प्रशासनाला सवाल विचारु इच्छितो, पण महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक होत नाही. सर्वसाधारण सभा घेतली जात नाही. ऑनलाईन सभा घ्यावी असे सत्ताधाऱ्यांना वाटत नाही. त्यामुळे लोकशाहीने आम्हाला जे अधिकार दिले आहेत त्यानुसार मुंबईकरांच्या अडचणी मांडायच्या कुठे असा प्रश्न आहे.

गट नेते प्रभाकर शिंदे म्हणाले की, ज्यावेळी त्यांचे अर्थपूर्ण विषय होते तेव्हा स्थायी समितीची बैठक घेतली. आता मुंबईकरांच्या विषयात सत्ताधारी पक्षाला रस नाही. पावसाळ्यात मुंबईकरांना धोक्यात घालायचे काम सत्ताधारी आणि प्रशासन करीत आहे.

पक्षनेते विनोद मिश्रा म्हणाले की, आयुक्त भेटणार नाहीत. नगरसेविकांचे ऐकणार नाहीत, सभा नाही, मग आम्ही मुंबईकरांचे प्रश्न मांडायचे कुठे. यावेळी नालेसफाईच्या कामात प्रचंड दिरंगाई झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे जीव धोक्यात आहेत.

First published: June 7, 2020, 11:42 PM IST

ताज्या बातम्या