Home /News /mumbai /

'हे राज्य कोणाच्या बापाचे नाही', संजय राऊतांच्या 'ठाकरे-पवार ब्रॅण्ड'ला निलेश राणेंचं उत्तर

'हे राज्य कोणाच्या बापाचे नाही', संजय राऊतांच्या 'ठाकरे-पवार ब्रॅण्ड'ला निलेश राणेंचं उत्तर

    मुंबई, 13 सप्टेंबर : 'ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे,' असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली होती. राऊतांच्या या भूमिकेवरून आता भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. ' त्याला सांगा जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जा.ते म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचंय काय? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं, हे राज्य कोणाच्या बापाचे नाही. हे राज्य जनतेने मोठे केले कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही,' अशा खरमरीत शब्दांमध्ये निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. नक्की काय म्हणाले होते संजय राऊत? '‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल' अशी चिंताही राऊतांनी व्यक्त केली. तसंच, 'मुंबईला पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय राजपूत, क्षत्रिय मते मिळविण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल. हे धोरण ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाऱ्य़ांना शोभणारे नाही.' असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: BJP, Sanjay raut

    पुढील बातम्या