मुंबई, 27 जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत 'हे तीन चाकी सरकार असेल तर त्याचे स्टेअरिंग माझ्याकडेच आहे' असं म्हणत भाजपला टोला लगावला होता. तसंच सरकार पाडूनच दाखवा, असं थेट आव्हान भाजपला दिले होते. त्यांच्या या आव्हानाला भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
भाजपची कार्यकारिणी बैठक सुरू आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. 'रिक्षांची स्टेअरिंग उद्धव ठाकरे यांच्या आहे पण त्यात बसलेली सवारी सांगते कोणत्या दिशेला ही रिक्षा चालली आहे ते कळत नाही. तुम्ही फक्त सरकार चालवून तर दाखवा', असं सणसणीत टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मराठा आरक्षणावर सुनावणीसाठी नवी तारीख, तोपर्यंत मेगाभरती नाही
'महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वत:च मारायचे आणि स्वत:च रडायचं असा प्रकार सुरू आहे. आम्हाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही. हे सरकार अंतर्विरोधाने पडेल' असं पुन्हा एकदा फडणवीस यांनी स्पष्ट केले.
'जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे अशा तोऱ्यात काही नेते बोलत आहे. पण हे बेईमानानं तयार झालेलं सरकार आहे. आम्ही ते सगळं विसरलो आहे. पण जेव्हा जेव्हा जनतेवर अन्याय होईल तेव्हा तेव्हा भाजप संघर्ष करेल' असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिला.
'कोरोनाच्या संकटात आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण लोकांवर अन्याय होत असेल तर आम्ही ते समोर आणू' असंही फडणवीस म्हणाले.
सामनाच्या मुलाखतीत विद्वान संपादक साखरेचा प्रश्न घेऊन हे केंद्रीय गृहमंत्र्यांकडे का गेले? मुख्यमंत्र्यांनाही माहिती नाही आणि ते आदेश बांदेकर गृहमंत्री वगैरे म्हणत होते, असं म्हणत फडणवीसांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली.
फक्त चेहरा आणि हात उरला, माढ्यात बेकरी चालकाची निर्घृण हत्या करुन टेम्पो पेटवला
दरम्यान, सकाळी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राज्य सरकारवर सडकून टीका केली. 'अशी बैठक कधी होईल असं वाटलं नव्हतं. पण गरज हीच शोधाची जननी आहे, असं म्हणतात. हे कौशल्य पण आपण चांगलं आत्मसात केलं आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात भाजपने खूप चांगलं काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे राज्य सरकारला चांगलेच उघडे पाडले आहे', असं म्हणत नड्डांनी भाजप नेत्यांचे कौतुक केले.
'महाराष्ट्रात स्वार्थाकरता एकत्र येऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हे सरकार आहे. या सरकारनं कोरोना परिस्थितीमध्येही भ्रष्टाचार केला आहे. त्यांचे कारनामे हे लोकांसमोर आणले पाहिजे', असंही नड्डा म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP