पुणे, 06 सप्टेंबर: शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay raut) यांनी 'आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, तर थेट कोथळा बाहेर काढतो', हे विधान केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य (Sanjay Raut Statement on Shivaji Maharaj) केल्याचा आरोप करत भाजपाकडून पुण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी केली जात आहे. या अनुषंगानं डेक्कन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, समोरून थेट कोथळा काढतो, त्याबद्दल शिवाजी महाराजांना अटक केली असती का? राऊतांच्या या वक्तव्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलेले काहीजण दररोज सकाळी ब्रशही न करता त्यांना शिव्या घालू लागले आहेत. पण, त्यानं काहीही फरक पडत नाही. राजकारणात पाठीत खंजीर खुपसणं हा शब्द उच्चारताच पूर्वी एक चेहरा समोर यायचा. पण आता त्या जागी वेगळाच चेहरा समोर येऊ लागला आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचा उल्लेख न करता टीका केली होती.
हेही वाचा-अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, निकटवर्तीयांना EDची नोटीस
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही. थेट समोरून वार करून कोथळा बाहेर काढतो. पण कोथळा काढण्याच्या वक्तव्यावर भाजपनं आक्षेप घेतला असून पुण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, केवळ 'मी थोबाडीत मारली असती' या राणेंच्या वक्तव्यावर त्यांना अटक करण्यात आली होती. याचा विचार केला तर संजय राऊतांचं विधान भयंकर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-दिसताच क्षणी अटक, अखेर ED कडून अनिल देशमुखांविरोधात लूक आऊट नोटीस?
याबाबत संजय राऊतांना विचारलं असता, त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, “मी असं काय केलं आहे की तक्रार दाखल करावी. कोणाचा कोथळा बाहेर काढू असं म्हटलंय? ते पाठीत खंजीर खुपसत होते. पाठीत खंजीर खुपसण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केले आहेत. त्यामुळे समोर कोथळा बाहेर काढतो, त्याबद्दल शिवाजी महाराजांना अटक केली असती का? असा सवालही राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे. राऊतांच्या या विधानानंतर भाजप आक्रमक झाला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.