अभिषेक पांडे, मुंबई 7 जून : मुंबई महानगर पालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता असली तरी आपल्याच पालिकेच्या अधिकाऱ्याविरुद्ध आंदोलनाची वेळ एका भाजप नगरसेवकावर आली. यावरून पोलिकेत नगसेवकांचंही फार काही चालत नाही असं दिसून आलंय. आपल्या प्रभागात दुकान दारांना त्रास देणाऱ्या पालिकेच्या एका अधिकाऱ्याविरुद्ध भाजपचे नगरसेवक मनोज मिश्रा यांना रात्रभर धरणं आंदोलन करावं लागलं. या आंदोलनानंतर पोलिसांनी त्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.
महापालिकेच्या पी. उत्तर प्रभागाचे अध्यक्ष आणि नगरसेवक मनोज मिश्रा यांनी पालिकेच्या अधिकाऱ्याच्या वर्तनाविरुद्ध अनेकदा तक्रारी केल्या मात्र त्या अधिकाऱ्याचे वर्तन काही सुधारत नव्हते. दुकानदारांना हफ्ते मागणे, पैसै दिले नाही तर सामान बाहेर काढून त्रास देणे, विरोध केला तर सरकारी कामात अडथळे आणले असे गुन्हे दाखल करणे असं हा अधिकारी करत होता.
यामुळे त्यांच्या प्रभागतले दुकानदार त्रासून गेले होते. अशा अनेक तक्रारी मिश्रा यांच्याकडे आल्या होत्या. या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी लोकांनी केली होती.
त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मनोज मिश्रा यांनी कुरार पोलीस स्टेशन बाहेर आपल्या समर्थकांसोबत धरणं धरलं. या आंदोलनामुळे पोलिसांवर दबाव आला. त्यानंतर शेवटी पोलिसांनी मिश्रा यांच्या तक्रारीवरून पालिकेच्या त्या असिस्टंट इन्स्पेक्टर विरुद्ध हफ्ते वसुलीचा गुन्हा नोंदवला. आतातरी त्या अधिकाऱ्याची मुजोरी कमी होईल अशी आशा मिश्रा यांनी व्यक्त केली. त्याचं वर्तन सुधारलं नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.