भाजप अंतिम निर्णयापर्यंत.. दुपारी 4 च्या बैठकीत सुटणार सत्तेचं 'गणित'

भाजप अंतिम निर्णयापर्यंत.. दुपारी 4 च्या बैठकीत सुटणार सत्तेचं 'गणित'

बहुमताचा आकडा गाठल्यानंतर भाजप-शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला.

  • Share this:

मुंबई,10 नोव्हेंबर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण स्वीकारावे की नाही याबाबत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक 'वर्षा' बंगल्यावर झाली. भाजप अंतिम निर्णयापर्यंत पोहोचला असून अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली.

राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पण भाजप नेत्यांची दुपारी 4 वाजता पुन्हा बैठक होणार असून त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्तास्थापनेबाबत अधिकृत भूमिका मांडणार आहे. नंतर आमचा निर्णय राज्यपालांना कळवण्यात येईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. दरम्यान, सत्तासंघर्षामुळे राज्यपालांचा नियोजित नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, बहुमताच्या अग्निपरीक्षेला भाजप सामोरे जाणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी सर्वात मोठा पक्ष भाजपला आमंत्रण दिले आहे. शिवसेना-भाजपने युती करून निवडणूक लढवली. पण बहुमताचा आकडा गाठल्यानंतर दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर आला. निकालानंतर त्यांच्यात सत्तेच्या वाटपावरून एकमत झाले नाही आणि युतीची चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे अखेर 8 नोव्हेंबर रोजी 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला. पण भाजपला सरकार स्थापन करता आले नाही. त्यानंतर पुढच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काळजावाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

भाजप हा 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 10, 2019, 2:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading