भाजपचे राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत, मुनगंटीवार म्हणतात काँग्रेसचा मंत्रीच घडवेल राजकारणात भूकंप

भाजपचे राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत, मुनगंटीवार म्हणतात काँग्रेसचा मंत्रीच घडवेल राजकारणात भूकंप

'या सरकारात अनेक जण नाराज, वडेट्टीवारांकडे भूकंप आणि पुनर्वसन खाते आहे, ते भूकंप घडवतील आणि मग त्यांचा पक्ष त्यांचे पुनर्वसन करेल.'

  • Share this:

मुंबई 08 जानेवारी : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येवून फक्त एक महिनाच पूर्ण झालाय. असं असतानाच राज्याच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या वृत्तानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही राज ठाकरेंच्या मनसेसोबत युतीचे संकेत दिले आहेत. राज ठाकरेंची आमच्यासारखीच वैचारिक भूमिका असेल तर भाजप आणि मनसेमध्ये युती शक्य आहे असे संकेत मुनगंटीवार यांनी दिले आहेत. शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका मवाळ करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन शिवसेनेच्या मतांमध्ये खिंडार पाडण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.

काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार हे नाराज आहेत. त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, या सरकारात अनेक जण नाराज, वडेट्टीवारांकडे भूकंप आणि पुनर्वसन खाते आहे, ते भूकंप घडवतील आणि मग त्यांचा पक्ष त्यांचे पुनर्वसन करेल. दीपिका पदुकोणच्या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी चुकीची आहे असंही त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, दीपिकाच्या जेएनयू भेटीबद्दल मात्र दु:ख आणि निषेध आहे. जेव्हा अतिरेकी हल्ल्यात जवान शहीद होता तेव्हा दीपिका तिकडे भेट का देत नाहीत, जेएनयूत भारतविरोधी घोषणा होतात तेव्हा जेएनयूत का जात नाहीत? असा सवालही मुंनगंटीवार यांनी केला.

अमित ठाकरेंच्या आधी आणखी एका दिग्गज नेत्याच्या मुलाची राजकारणात दमदार एन्ट्री

तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ज्यांची मनं दुखावलेली आहेत त्यांना पुन्हा जोडायला वेळ लागेल असा टोला त्यांनी लगावलाय.

राज ठाकरे फडणवीस भेट

गेल्या काही वर्षांपासून भाजपवर तुटून पडणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नवी भूमिका घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे आलीय. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढच्या वाटचालीत ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जातेय. मुंबईत या दोनही नेत्यांमध्ये दीड तास खलबतं झाली असून त्यात नव्या राजकारणाबद्दल चर्चा झाल्याची माहिती पुढे येतेय.

ZP Election Result : अकोल्यात वंचित आघाडीवर तर वाशिममध्ये भाजप-शिवसनेत रस्सीखेच

राज आणि फडणवीस यांच्या कॉमन मित्राच्या पुढाकारातून ही भेट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे यापुढच्या काळात भाजप आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे. येत्या 23 तारखेला मुंबईत मनसेचं महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाची नवी भूमिका ठरविणार आहेत. गेली काही वर्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर त्यांनी जाहीर सभांमधून व्हिडीओ दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती.

 

 

Published by: Ajay Kautikwar
First published: January 8, 2020, 3:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading