मुंबई, 30 सप्टेंबर : मुंबई महापालिकेतील अत्यंत महत्त्वाची आणि आर्थिक नाड्या असलेली समिती म्हणजे स्थायी समिती. या समितीचा कार्यकाळ पूर्ण होऊनही कोविडमुळे निवडणुका घेता आल्या नव्हत्या. आता या निवडणुका घेण्यात येणार आहेत. पैकी स्थायी समिती आणि शिक्षण समिती यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख होती.
शिवसेनेकडून यशवंत जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. महापालिकेतील शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची नाराजी डावलून यशवंत जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महापालिकेत विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष यांच्या वतीने सुद्धा उमेदवार देण्यात आले आहेत.
काँग्रेसकडून आसिफ झकेरिया यांनी स्थायी समितीसाठी तर संगीता हंडोरे यांनी शिक्षण समितीसाठी अर्ज भरला आहे. तर पहारेकऱ्याच्या भूमिकेत असलेल्या भाजपनेही या निवडणुकीसाठी आपले उमेदवार दिले आहेत. भाजपकडून मकरंद नार्वेकर यांना स्थायी समितीसाठी तर सुरेखा पाटील यांना शिक्षण समितीसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे.
यावेळी ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण यशवंत जाधव यांच्या कारभारावर नाराज असलेल्या विरोधकांनी आपली मोट बांधली आहे. तर भाजपनेही उमेदवार दिल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. 5 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार असून शिवसेनेला पुन्हा जिंकण्याचा विश्वास आहे, तर काँग्रेस आणि भाजपही मुंबई महापालिकेच्या आर्थिक नाड्या हातात घेण्यासाठी उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.