Home /News /mumbai /

आचार्य तुषार भोसले उद्धव ठाकरेंवर संतापले; म्हणाले, 'अजब मुख्यमंत्री'

आचार्य तुषार भोसले उद्धव ठाकरेंवर संतापले; म्हणाले, 'अजब मुख्यमंत्री'

भाजपचे अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे.

    मुंबई, 8 नोव्हेंबर : 'देव आणि भक्तांमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून जो अडथळा निर्माण झाला आहे, तो दिवाळी पूर्वी संपेल आणि जीवनात भक्ती- चैतन्याचा दीप प्रदिप्त होईल असे वाटले होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणाने हे स्पष्ट झाले की हा अंधःकार अजूनही कायम राहणार आहे. मंदिरात तल्लीन झाल्याने कोरोना पसरतो असा अजब निष्कर्ष काढणारा गजब मुख्यमंत्री,' असं म्हणत भाजपचे अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे. आचार्य भोसले यांनी म्हटलं आहे की, 'मंदिरांवर उपजीविका अवलंबून असलेले सर्व व्यावसायिक आणि लाखो गरीब कुटुंबांची आठ महिन्यांपासून उपासमार सुरु आहे. त्यांना कोणतीही आर्थिक मदत जाहीर न करता आणि मंदिरे उघडण्याचा देखील निर्णय न घेता आपण दिवाळीच्या शुभेच्छा कशा देऊ शकतो? त्यांनी दिवाळी कशी साजरी करावी ? हे सुद्धा कळाले नाही.' 'मंदिरात भक्त तल्लीन झाल्याने कोरोना संसर्ग पसरतो, असे वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या अजब ज्ञानाचे प्रदर्शन घडविले आहे. उद्धवजी, भक्त मनाने "तल्लीन" होतो तो "टल्ली" होत नसतो. टल्ली होण्याची साधने आपण उघडली आहेत आणि मंदिरात अंतरंगाने तल्लीन होण्यातून कोरोना पसरतो हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हास्यास्पद निष्कर्ष आहे,' असं म्हणत आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मंदिर प्रश्नी काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 'मंदिरे कधी उघडणार असं विचारलं जात आहे. दिवाळीनंतर एक नियामवली केली जाणार आहे. गर्दी टाळणे हाच एक नियम असणार आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीपोटी मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला नाही', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. तसंच महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम महाराष्ट्र द्वेष्यांनी केले होते, पण त्यांचे प्रयत्न हाणून पाडले आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: BJP, Uddhav thackeray

    पुढील बातम्या