Home /News /mumbai /

काँग्रेसवर बोलण्यापेक्षा आपलं तोंड बंद ठेवा, निरुपम यांनी संजय राऊतांना फटकारलं

काँग्रेसवर बोलण्यापेक्षा आपलं तोंड बंद ठेवा, निरुपम यांनी संजय राऊतांना फटकारलं

बिहारमध्ये जे निकाल हाती येत आहेत त्यात काँग्रेसची कामगिरी ही फारशी चांगली राहिली नाही असं स्पष्ट होत आहे. त्यावरून राऊतांनी काँग्रेसला टोला लगावला होता.

    मुंबई 10 नोव्हेंबर: काँग्रेसने चांगली कामगिरी केली असती तर तेजस्वी आत्तापर्यंत मुख्यमंत्री झाला असता असं सूचक वक्तव्य करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला लगावला होता. राऊतांच्या या टोल्यावर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राऊतांना त्यांचं नाव न घेता चांगलंच फटकारलं आहे. काँग्रेसवर बोलत सल्ला देण्यापेक्षा शिवसेनेनं आपलं तोंड बंद ठेवावं असं निरुपम यांनी म्हटलं आहे. संजय निरुपम म्हणाले, शिवसेनेने बिहारमध्ये 22 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातल्या 21 जागांवर त्यांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाल्याचं ऐकलं आहे. त्यामुळे काँग्रेसला सल्ला देत बसण्यापेक्षा शिवसेनेने आपलं तोंड बंद ठेवावं. बिहारमध्ये जे निकाल हाती येत आहेत त्यात काँग्रेसची कामगिरी ही फारशी चांगली राहिली नाही असं स्पष्ट होत आहे. त्यावरून राऊतांनी काँग्रेसला टोला लगावला होता. काय म्हणाले होते संजय राऊत?  बिहारचे सर्व निकाल अजून समोर आलेले नाहीत. रात्री 10-11 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल. पण नितीशकुमार हे तिसऱ्या नंबरवर आहेत.  मुख्यमंत्रिपदी तीन वेळा राहूनही त्यांची पार्टी तीन नंबरवर जात असेल तर विचार करण्याची वेळ आली आहे. सरकार फेल गेलीय, हेच समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या नितीशकुमार यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोला संजय राऊत यांनी नितीश कुमारांना लगावला. मतमोजणी प्रक्रिया खूप हळू चालली आहे. पण जर काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर आतापर्यंत तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते, असंही राऊत म्हणाले. 'भाजप आता मित्रांना व्यवस्थित वागवते आहे.  त्यामुळे नितीश कुमार यांनी सेनेला धन्यवाद दिले पाहिजे. विशेष म्हणजे, भाजपचे नेते  देवेंद्र फडणवीस हे बिहारच्या निवडणुकीत प्रमुख होते. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर केंद्रातही त्यांचे वजन आहे. त्यामुळे त्यांनी नक्कीच बिहारमध्ये सूत्र फिरवली असतील, त्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार त्यांचे अभिनंदन नक्कीच केले पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Sanjay nirupam, Sanjay raut

    पुढील बातम्या