अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत पुन्हा मोठा ट्विस्ट, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर राज्यपालांची नाराजी

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत पुन्हा मोठा ट्विस्ट, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर राज्यपालांची नाराजी

'अंतिमच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची की नाही ते विद्यापीठ कायद्याच्या आधारे ठरवलं जाईल,' असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 2 जून : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हरकत घेतली आहे. 'अंतिमच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची की नाही ते विद्यापीठ कायद्याच्या आधारे ठरवलं जाईल,' असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

'परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे,' असं म्हणत राज्यपाल कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे. राज्य सरकार या निर्णयावर राज्यपालांनीच नाराजी व्यक्त केल्याने आता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची धाकधूक पुन्हा एकदा वाढली आहे. परीक्षा होणार की नाही, याबाबतचा संभ्रम आणखी वाढला आहे.

नक्की काय म्हणाले राज्यपाल?

- परीक्षा न घेतल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होईल - राज्यपाल

- आपल्या पत्राला उत्तर न देता थेट प्रसार माध्यमातून परीक्षा रद्द केल्याचा निर्णय कळाल्यानं आपल्याला धक्का बसल्याचं राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे

- उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील कुलगुरूंच्या समितीचा अहवाल खात्याचा अहवाल 6 मे रोजी सादर करण्यात आलाय पण तो आपल्याकडे सुपुर्द करण्यात आला नसल्याचंही राज्यपालांनी या पत्रात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

- नुकत्याच झालेल्या कुलगुरुंच्या व्हीसीमध्ये परीक्षा घेण्याची तयारी दाखवल्याचंही राज्यपालांनी विशेष नमूद केलं आहे

- पदवी मिळवण्याकरता परीक्षा द्या किंवा देऊ नका असे ऐच्छिक पर्याय असू शकत नाहीत असंही राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटलंय

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

'आमच्यातील पालक जिवंत आहे. कोरानाचा संसर्ग सुरू असताना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकत नाही. सर्व सत्र परीक्षांचे सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना पास करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे परीक्षा देण्याची त्यांना सर्व सुरळित झाल्यावर तशी व्यवस्था करण्यात येईल,' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली होती.

उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर भाजपने व्यक्त केली होती नाराजी

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन झाला का? तरुणांच्या माथी "जळीत बीए" प्रमाणे "कोरोना ग्रॅज्युएट" बिरुदावली लागणार का? असा सवाल करत आशिष शेलार यांनी राजभवनवर जाऊन कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांनी पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते. तर आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली.

First published: June 2, 2020, 8:22 PM IST

ताज्या बातम्या