Home /News /mumbai /

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चर्चा, संजय राऊत-देवेंद्र फडणवीस यांची भेट?

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चर्चा, संजय राऊत-देवेंद्र फडणवीस यांची भेट?

संजय राऊत हे वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात टीका करत असतानाच ही भेट झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.

    मुंबई, 26 सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत आणि भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत आज दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली असून राज्याच्या राजकारणाबद्दल खलबतं झाल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत हे वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात टीका करत असतानाच ही भेट झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारविरोधात टीका होत आहे. तसंच बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतरही ठाकरे सरकारची कोंडी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने काही राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत का, अशी चर्चा रंगू लागली आहे. संजय राऊत यांची भेट का आहे महत्त्वाची? विधानसभा निवडणुकीनंतर भाजपपासून दूर होत शिवसेना सत्तास्थापनेसाठी हालचाली करत असताना संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. महाविकास आघाडीची स्थापना करताना संजय राऊत हे सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात होते, तर दुसरीकडे भाजपवर हल्लाबोल करत नव्या आघाडीसाठी वातावरणनिर्मिती करण्यातही राऊत हेच आघाडीवर होते. संजय राऊत यांनी या सर्व काळात शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली आणि मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. सत्ता स्थापनेनंतरही संजय राऊत हेच शिवसेनेची भूमिका प्रामुख्याने मांडत आहेत. त्यामुळे आज त्यांनी घेतलेली देवेंद्र फडणवीस यांची भेट ही पक्षाच्याच अजेंड्याचा भाग असू शकते. त्यामुळे फडणवीस-राऊत भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.
    First published:

    पुढील बातम्या