मुंबई, 16 ऑक्टोबर : राज्य सरकारने महिलांसाठी मुंबई लोकल सेवा सुरू करण्याची भूमिका घेतल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत होता. मात्र सरकारने ही भूमिका घेतली असली तरी तुर्तास पश्चिम आणि मध्य लोकल सेवा उद्यापासून महिलांसाठी सुरू होणार नाही. लगेच एका दिवशी लोकल सेवा सुरू करणे शक्य नाही, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
पश्चिम रेल्वे जनसंपर्क विभाग वतीने सांगण्यात आलं आहे की, ' लोकल सेवा सुरू करावी अशी विनंती राज्य सरकारने पत्राने केली. पण लगेच लोक सुरू करता येणार नाही. रेल्वे बोर्डासमोर प्रस्ताव ठेवला आहे, तसंच लोकल सेवा वाढवण्यास काही यंत्रणा, कर्मचारी वाढवावे लागतील. ही सेवा लगेच एका दिवशी सुरू करणे शक्य नाही, तसे पत्राव्दारे आम्ही राज्य सरकारलाही कळवलं आहे.'
रेल्वे बोर्डाने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत रेल्वे बोर्ड निर्णय घेत नाही तोपर्यंत महिलांना लोकलने प्रवास करता येणार नाही. यामुळे लोकल प्रवासासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांचा हिरमोड झाला आहे.
नेमकं काय होतं राज्य सरकारचं परिपत्रक?
राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात पत्रक काढलं होतं. तसंच हे पत्रक रेल्वे विभागाला पाठवण्यात आलं. त्यात महिलांना प्रवासाची मुभा द्यावी अशी विनंती करण्यात आली. पत्रात दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर शेवटच्या लोकल पर्यंत प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती करण्यात आली. सकाळी मात्र लोकलमध्ये महिला प्रवास करता येणार नाही, असंही नमूद करण्यात आलं होतं. प्रवासासाठी क्यूआर कोडची गरज नाही. सर्वच महिलांना लोकल प्रवास करता येईल, असंही सांगण्यात आलं होतं. मात्र रेल्वेकडून अद्याप हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही.
का होत आहे लोकल सुरू करण्याची मागणी?
गेल्या अनेक दिवसांपासून सर्व चाकरमान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. अपुऱ्या लोकलच्या फेऱ्या आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी यामुळे कामावर जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नोकरीनिमित्त जाण्या येण्यातच अनेक तास वाया जात असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लोकलबाबत मागणी करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.