Home /News /mumbai /

MMRDAच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता ई-ऑफिसचा वापर अनिवार्य

MMRDAच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता ई-ऑफिसचा वापर अनिवार्य

एमएमआरडीएच्या विभागांकडून परवानग्यांना लवकर मंजूऱ्या मिळू शकणार आहेत.

    मुंबई, 16 नोव्हेंबर : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ई-ऑफिसचा वापर अनिवार्य केला आहे. यामुळे प्राधिकरणाचे कामकाज अधिक गतिमान होणार असून सार्वजनिक प्रकल्पांच्या प्रगतीसह इतर सरकारी एजन्सी व एमएमआरडीएच्या विभागांकडून परवानग्यांना लवकर मंजूऱ्या मिळू शकणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, अतिरिक्त महानगर आयुक्त –1, अतिरिक्त महानगर आयुक्त – 2 आणि विभाग प्रमुख यांच्या फायली, प्रस्तावांचे सर्व कामकाज ई-ऑफिसमार्फत सादर केले गेले. ही अंमलबजावणी 15 सप्टेंबरपासून करण्यात आली. मार्च 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा उद्रेक हा साथीचा रोग म्हणून घोषित केला. 24 मार्च 2020 च्या भारत सरकारच्या आदेशानुसार 25 मार्च 2020 पासून 21 दिवसांच्या कालावधीसाठी राष्ट्रव्यापी लॉकडाउन जाहीर केले गेले, जे पुढील 31 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आले. नंतर देशात हळूहळू अनलॉक करण्याच्या दिशेने कार्यवाही केली गेली. याकाळात यशस्वी ठरलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’च्या संकल्पनेतून प्रेरीत होऊन एमएमआरडीएने आपल्या कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस सेवा मिळण्यासाठी विद्यमान आयटी पायाभूत सुविधा सुधारित केल्या आहेत. याचा परिणाम म्हणून केवळ ई-मेलवर विविध प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान कर्मचाऱ्यांकरिता ‘वर्क फ्रॉम होम’ सुलभ करण्यासाठी ई-ऑफिसच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिले गेले. ई-ऑफिसचे कार्यान्वयन एनआयसी मार्फत करण्यात आले आहे. शासनाच्या 6 ऑगस्ट 2012 आणि 9 ऑगस्ट 2012 रोजीच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या सुचनांनुसार ही यंत्रणा कार्यान्वित केली गेली. या शासन निर्णयाद्वारे शासकीय विभाग व प्राधिकरणामध्ये ई- ऑफिसची अंमलबजावणी अनिवार्य करण्यात आली आहे. एमएमआरडीएने तांत्रिक सहाय्य आणि ई-ऑफिस प्रयोगाच्या सॉफ्टवेअर देखभालीसाठी एनआयसीएसआयचे (एनआयसीची मनुष्यबळ सेवा संस्था) 5 मनुष्यबळ नियुक्त केले आहे. याद्वारे ई-ऑफिसचे कार्यान्वयन सुलभ, जबाबदार करण्याबरोबरच ई-कारभारास प्रोत्साहीत करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या अगोदर ई-ऑफिसचा वापर हा फक्त लोकल एरिया नेटवर्क वापरणाऱ्या म्हणजेच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच होता. एमएमआरडीएने प्रायोगिक तत्वावर 3 विभांगांसाठी ई-ऑफिस सुरु केले होते. त्यातील अनुभव आणि माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे एमएमआरडीए आणि एनआयसीने आता एमएमआरडीएच्या कामकाजाच्या गरजांनुसार ई-ऑफिस सॉफ्टवेअर विकसीत केले आहे. एमएमआरडीएने हे अनुकुल असे सॉफ्टवेअर लॉकडाऊनच्या काळात लाँच केले. याला कर्मचाऱ्यांमध्ये खूप चांगले यश मिळाले. या प्रणालीमुळे इंटरनेट कनेक्टीव्हीटीच्या आधारे कर्मचारी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काम करु शकले. मोबाईलवरही ई-ऑफिसचा वापर करता आला. त्यामुळे ई-ऑफिसच्या आधारे काम करण्यामुळे कामकाजातील दिरंगाई टळली. शिवाय ई-गव्हर्नन्स साध्य करण्याच्या एमएमआरडीएच्या उद्दीष्टाची पुर्ती होत असून कार्यालयातील पेपरवर्क कमी झाल्यामुळे कार्बन फूटप्रींटही कमी होण्यास मदत होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात एमएमआरडीएने विविध सत्रे आणि सादरीकरणे करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साधनांचा प्रभावीपणे वापर केला. त्याशिवाय डिजिटल ॲप्लिकेशन्सद्वारे ई-ऑफिस कसे वापरावे याबद्दल 600 कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. प्राधिकरणाने सी-डॅककडून कर्मचाऱ्यांसाठी आधार सत्यापित डिजिटल स्वाक्षरी म्हणजेच ई-साइन सेवा सुरु केली आहे. एमएमआरडीएसाठी ई-ऑफिस प्रणालीत डीएससी स्वाक्षरी आणि ई-स्वाक्षरी सुलभ करण्यासाठी संपूर्ण सिस्टम एकत्रित केली गेली आहे. अशा प्रकारे सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित डिजिटल स्वाक्षरी पर्यायांचा वापर करून ई-ऑफिस प्रयोग वापरण्यास सक्षम बनविले गेले आहे. 500 डीएससी प्राप्त करण्यात आल्या असून एमएमआरडीएतील ई-ऑफिस वापरकर्त्यांसाठी त्यातील 80 टक्के डीएससी सक्रियही करण्यात आल्या आहेत. तसेच, कोणतीही गडबड होऊ नये यासाठी प्रणालीत सुरक्षीतता आणण्यात आली असून टपालाचे योग्य विभाजन करण्यासाठी तसेच केंद्रीय नोंदणी युनिट (सीआरयू) संसाधनांना संबंधित विभागांमध्ये वितरित करण्यासाठी व्यवस्था केली गेली आहे. यासंदर्भात बोलताना एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव म्हणाले की, "गेल्या काही वर्षांत आमचे लक्ष एमएमआरडीएच्या काम चालू असलेल्या सर्व प्रकल्पांची गुणवत्ता वाढवणे आणि ते वेळेत पूर्ण करण्यावर केंद्रीत आहे. लॉकडाऊनच्या काळात एमएमआरडीएच्या आयटी सेलमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे, जेणेकरून कामकाजाचा प्रवाह सुनिश्चित आणि गतिमान होऊ शकेल. लॉकडाउनच्या काळात ई-ऑफिसची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण होती. डिजिटल वर्किंगच्या वापरामुळे प्रकल्पांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. प्रकल्प यशस्वीरीत्या अंमलात आणण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्षमता देखील वाढली आहे. " ते पुढे म्हणाले की, "माझे कार्यालय आता प्रत्यक्षात फायली घेत नाही आणि फक्त ई-फायली स्वीकारतो, यामुळे सर्व विभागांना फाइल्स ऑनलाइन पाठविण्यास प्रवृत्त केले गेले आहे. यामुळे एमएमआरडीएच्या वेगवान निर्णय आणि गतिमान कामकाजाला नक्कीच मदत झाली आहे, असं ते म्हणाले.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या