मुंबई, 9 सप्टेंबर : महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या संदर्भातील निकाल दिला आहे. छगन भुजबळ यांच्यासह एकूण सहा जणांना न्यायालयाने दोषमुक्त केलं आहे. छगन भुजबळ, समीर भुजबळ, समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, संजय जोशी, गीता जोशी यांना दोषमुक्त करण्यात आलं आहे.
छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून दोषमुक्त करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत आहे. पेढ्यांचं वाटप करुन भुजबळांचे समर्थक जल्लोष करत आहेत.
मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत हायकोर्टात दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे.
छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना Session's court कडून महाराष्ट्र सदन केस मधून डिस्चार्ज मिळाला आहे. ह्या डिस्चार्ज ला मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 9, 2021
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या काळात महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. विविध कंत्राटाच्या माध्यमातून छगन भुजबळ यांना लाखो रुपये लाच म्हणून देण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानेही छगन भुजबळांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणी सत्र न्यायालयाने छगन भुजबळांना दोषमुक्त केल्याने त्यांना हा एक मोठा दिलासा आहे.
महाराष्ट्र सदन प्रकरणात सर्वप्रथम एसीबीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात छगन भुजबळ याची कारागृहात देखील रवानगी करण्यात आली होती.
नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सर्वप्रथम एसीबीकडून गुन्हा दाखल
त्यानंतर ईडीकडून तपास सुरू करण्यात आला
भुजबळांची 200 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली
तपासा दरम्यान भुजबळांच्या विरोधात सबळ पुरावे आढळून आल्याचं म्हटलं गेलं
सुधारित कलमे लाऊन खटला मजबूत करण्यात आला
यानंतर 2016 ते 2018 या कालावधीत छगन भुजबळ यांना जेलमध्ये जावं लागलं होतं
4 मे 2018 मध्ये भुजबळांना जामीन मंजूर झाला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP