मुंबई, 28 जुलै : आज मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या एकदम कमी आल्याने मुंबईकरांनी दिलासा व्यक्त केला आहे. असे असले तरी पुढील काही दिवस हा आकडा अधिक कमी होण्याची अपेक्षा आहे. असे झाले तरच कोरोनावर नियंत्रण घेण्यात यश आल्याचे म्हणता येईल.
मुंबईची सध्याची परिस्थिती पाहता या भागात हर्ड इम्युनिटीची (सामूहित प्रतिकारशक्ती) शक्यता व्यक्त केली जाते. पालिकेकडून घेतल्या जाणाऱ्या अँटिबॉडी सर्वेक्षणातून 57 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी आढळल्या आहे. पालिका आणि इतर संस्थांच्या एकत्रित सेरॉलॉजीकल सर्वेत हे सिद्ध झाले आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या दुसऱ्या सर्वेक्षणात हर्ड इम्युनिटीवर सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये सार्स-कोविड 2 संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्साचा उपक्रम सुरु केला होता. भारतातील एक व्यापक अवछेदी सर्वेक्षण (क्रॉस-सेक्शनल सर्वे) म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये असलेल्या रक्तातील प्रतिद्रव्य (ऍन्टीबॉडीज) चे प्राबल्य जाणून घेणे हे होते. त्यासाठी यादृच्छिक पद्धती (Random Sampling) ने नमुने संकलित करण्यात आले. त्यात सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या साथ आजाराचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन फेऱ्यांमधून सर्वेक्षण घेण्याचे निश्चित करण्यात आले होते.
पहिल्या फेरीमध्ये 8 हजार 870 पैकी एकूण 6 हजार 936 नमुने संकलित करण्यात आले. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींची स्वच्छेने संमती प्राप्त करून त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली.
हर्ड इम्युनिटी - हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची रोग प्रतिकारकशक्ती. हर्ड इम्युनिटीमुळे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाणाऱ्या रोगाचा प्रसार मंदावतो.
सर्वसाधारण लोकसंख्येतील अभ्यासातून आढळून आलेल्या मुख्य बाबीः
या सर्वेक्षण अभ्यासाचा कालावधी हा जुलै 2020 या महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील 12 ते 14 दिवसांचा होता. सर्वेक्षणामध्ये निर्धारित लक्ष्यापैकी झोपडपट्टी भागातून 100 टक्के तर बिगर झोपडपट्टी भागातून सरासरी 70 टक्के प्रतिनिधी सहभागी झाले.
1 संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 57 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 16 टक्के याप्रमाणे या रक्तातील प्रतिद्रव्य (ऍन्टीबॉडीज) चे प्राबल्य आढळून आले आहे.
2 असे ऍन्टीबॉडीज प्राबल्य महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले असले तरी या तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले आहे.
सर्वेक्षणाचे परिणाम असे दर्शवतात की, एकूण संसर्गाच्या प्रमाणापैकी लक्षणे नसलेल्या बाधितांचे (एसिम्प्टोमॅटिक) प्रमाण हे जास्त असू शकते. झोपडपट्टी परिसरांमध्ये जास्त प्राबल्य आढळून येण्याचे कारण लोकसंख्येची घनता आणि सामुदायिक सुविधा (जसे की- शौचालये, पाण्याची स्थळे) वापरणे हे देखील असू शकते.
सामूहिक प्रतिरोधक शक्ती (हर्ड इम्यूनिटी) संदर्भात अधिक अभ्यास करण्यासाठी शोधलेले सदर परिणाम महत्त्वाचे ठरतील.
येत्या काळाचा विचार करता, सध्याचा अभ्यास/विश्लेषण हे (अ) न्यूट्रलायझिंग ऍन्टीबॉडीज, (ब) सार्स कोविड २ संसर्गातील धोक्याचे घटक याबाबतची माहिती देईल. सर्वेक्षणाच्या पुढील नियोजित फेऱ्यांमधून झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी भागांमधील संसर्गाच्या फैलावाची माहिती मिळू शकेल तसेच सामूहिक प्रतिरोधक शक्ती (हर्ड इम्युनिटी) बाबतदेखील स्थिती कळू शकेल.