पत्नीचे हात-पाय बांधले अन् कुटुंबाला धाकवला बंदुकीचा धाक, दरोडेखोरांनी लुटले तब्बल 1 कोटी 86 लाख

पत्नीचे हात-पाय बांधले अन् कुटुंबाला धाकवला बंदुकीचा धाक, दरोडेखोरांनी लुटले तब्बल 1 कोटी 86 लाख

एकूण 1 कोटी 86 लाख 30 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

रवी शिंदे, भिवंडी, 31 जानेवारी : भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी मोठी लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरोडेखोरांच्या टोळक्याने जगदीश बळीराम पाटील यांच्या घरात शिरून त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवून घरातील 60 लाखांच्या रोख रकमेसह 1 कोटी 26 लाख 30 हजार रुपयांचे 421 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 1 कोटी 86 लाख 30 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेल्याची घटना घडली आहे.

दरोड्याच्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या दरोड्याचा गुन्हा दाखल होताच स्थानिक नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाला लागली आहे. काल्हेर येथील गोदाम व्यावसायिक जगदीश बळीराम पाटील यांची ठाणे भिवंडी रस्त्यालगत बी.सी.अपार्टमेंट ही इमारत असून तिच्या पहिल्या मजल्यावर ते आपल्या पत्नी वंदना ,मुलगा शुभम, मुलगी पल्लवी आणि वयोवृद्ध आई इंदिरा यांच्यासोबत राहत आहे.

जगदीश पाटील हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सहा वाजता घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे फक्त दरवाजा ओढला. ते बाहेर पडताच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले चौघे लुटारू इमारतीच्या जिन्यावरून चढून त्यांनी घराचा दरवाजाचे आतील कुलूप उघडले आणि लुटारु घरात शिरले.

हातावरची मेहंदी उतरण्याआधीच मृत्यूने गाठलं, नवविवाहितेला हौस पडली महागात

लुटारूंनी घरात प्रवेश करताच पत्नी वंदना आणि मुलगी पल्लवी झोपलेल्या खोलीत ते शिरले. तसंच दोघींना जगदीश पाटील यांना ठार मारू अशी धमकी देत पत्नी वंदनाचे हात रस्सीने बांधून मुलीस कपाटाचे लॉकर उघडण्यास सांगितले आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम ताब्यात घेतले. त्यानंतर मुलगा शुभम झोपलेल्या खोलीत लुटारूंनी मोर्चा वळवला.

त्यावेळी शुभम झोपेतून जागा होताच त्याचेसुध्दा हात रस्सीने बांधून तेथील कपाटातील सर्व ऐवज काढून घेऊन अवघ्या 20 मिनिटातच घरातील 60 लाखांची रोकड आणि 1 कोटी 26 लाख 30 हजार रुपये किंमतीचे 421 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आदी ऐवज घेऊन लुटारूंनी पोबारा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि लुटून नेलेला मुद्देमाल पाहता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन श्वान पथक, ठसे तज्ञ आदींच्या पथकांना घटनास्थळी पाचारण केले.

याप्रकरणी शुभम पाटील याने दाखल केलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघा लुटारुंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासासाठी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या नेतृत्वाखाली आठ तर गुन्हे शाखा भिवंडी ,ठाणे ,खंडणी विरोधी पथक अशी एकूण बारा पथके नेमण्यात आली असून काल्हेर परिसरातील सर्व सीसीटीव्हीचा तपास घेऊन आरोपींचा शोध सुरू केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.

First published: January 31, 2020, 9:49 PM IST
Tags: Bhiwandi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading