मुंबई, 7 मे: मुंबईत विविध ठिकाणी कोविड सेंटर्स (Covid center) तयार करण्यात आले आहेत. अशाच प्रकारे मुंबई पूर्व उपनगरात असलेल्या भांडूप येथील ड्रीम्स मॉलमध्ये (Dreams Mall) सुद्धा एक कोविड रुग्णालय (Covid Hospital) तयार करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने 25 मार्च रोजी या रुग्णालयाला आग लागली आणि यात 11 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाअंती दोन आरोपींना अटक (2 accused arrested) केली आहे.
पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले की, शासन मान्यता प्राप्त अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करणारे पोना कॉर्पोरेशनचे मालक हरेश दहयालाल जोशी यांनी प्रिव्हिलेज हेल्थकेअर कंपनीचे सीईओ जॉर्ज पुथ्थु सेरी यांच्यासोबत संगमनत करून स्वत: तसेच सनराईज रुग्णालयाच्या फायद्यासाठी एचडीआयएल ड्रिम्स मॉलची अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसताना देखील कार्यक्षम असल्याचे खोटे प्रमाणपत्र अग्निशमन विभागाला सादर केले. तसेच त्यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे निष्पन्न झाले.
वाचा: 10 बळी घेणाऱ्या अग्नितांडवानंतरची ही भीषण दृश्य पाहून मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींचा गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने त्यांना चौकशीअंती अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 10 मे 2021 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
भांडूपमधील ड्रीम मॉल येथे कोविड बाधितांसाठी सनराईज रुग्णालय तयार करण्यात आले होते. 25 मार्च 2021 रोजी या ड्रीम मॉलला मध्यरात्री आग लागली. ही आग इतकी भीषण होती की मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराईज रुग्णालयापर्यंत ती पोहोचली. या आगीत रुग्णालयातील 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.