बेस्टचा तिढा कायम, संप सुरूच राहणार!

बेस्टचा तिढा कायम, संप सुरूच राहणार!

'संप मागे घेण्याचा निर्णय तुम्ही आज घ्या आणि आम्हाला अधिकृतरित्या उद्या कळवला तरी चालेल', अशी सुचना कोर्टाने केली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : बेस्टच्या संपावर आठव्या दिवशीही कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे बेस्टचा संपाचा आणखी एक दिवस वाढला आहे. मुंबई हायकोर्टाने बेस्टच्या कर्मचारी संघटनेला संप मागे घेण्याचे आदेश दिले आहे. परंतु, संघटना अजूनही संपावर ठाम आहे. उद्या पुन्हा याबद्दल सुनावणी होणार आहे.

बेस्टबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आज कोर्टात मांडण्यात आला. मागण्यांची कालबद्ध पद्धतीनं पूर्तता करता येईल, पण आधी संप मागे घ्यावा, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं होतं. गेल्या दीड वर्षात अर्थसंकल्प विलिनीकरणाचा प्रस्ताव मनपा आयुक्तांनी सरकारकडे का पाठवला नाही, असा खडा सवालही कोर्टानं विचारला.

यावर महापालिकेनं उत्तर दिलं की, 'आम्ही अनेक प्रस्ताव सरकारकडे पाठवतो, पण प्रत्येक प्रस्तावाकडे राज्य सरकार लक्ष देईलच असं नाही.' असं म्हणत महापालिकेनं सरकारवर जबाबदारी ढकलली.

कामगारांनी तडजोडीसाठी तयार होऊन संप मागे घ्यावा अन्यथा सरकार कारवाई करेल, असं अहवालात म्हटलं आहे. कामगारांच्या सर्व मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार केला जाईल, असंही अहवालात नमूद करण्यात आले आहे. समितीच्या अहवालाचे मुद्दे कोर्टाने कामगार संघटनांच्या वकिलांना वाचायला दिले आहेत. तर

कामगार संघटनांनी आज ६ वाजेपर्यंत संप मागे घेण्याचा निर्णय घ्यावा अशी विनंती मनपा आणि बेस्ट प्रशासनाने केली आहे. तर संप मागे घेण्याचा निर्णय तुम्ही आज घ्या आणि आम्हाला अधिकृतरित्या उद्या कळवला तरी चालेल अशी सुचनाही हायकोर्टाने कामगार संघटनांना केली आहे.

कोर्टात काय घडलं?

- आपण ही भूमिका घ्यायला हवी की कामगार संघटना संप उगाच ताणतोय. कारण, 225 कोटी रुपयांचा बोजा घेऊन बेस्ट जर 1250 ची वाढ द्यायला तयार आहे तर कामगार संघटनांनी ही एक पाऊल मागे गेलं पाहिजे - हायकोर्ट

- दरवेळी तुम्ही कोर्टातल्या गोष्टी संघटनांना सांगणार मग इकडे युक्तिवाद करणार, यात किती वेळ घालवणार?, हायकोर्टाचा कामगार संघटनांच्या वकिलांना सवाल

- एकेक करुन तुम्ही प्रत्येक मुद्याची चर्चा करा, तुम्हाला प्राधान्याने काय हवंय ते ठरवा आणि मार्ग काढा, हायकोर्टाची कामगार संघटनांना सुचना

- सध्या वेतनश्रेणी 5430 आहे आणि त्यात 20 टप्प्याची वाढ होऊन ती 7930 होण्याची मागणी आहे. पण जर बेस्ट 10 टप्प्याची वाढ देईल तर ती 6680 इतकी होईल

- आम्ही उच्चस्तरीय समितीनं केलेल्या कामाचं कौतुक करतो, त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे - हायकोर्ट

- आम्हाला कृती समितीला हे सगळं सांगावं लागेल - कामगार संघटनांचे वकील

- संपाची नोटीस फक्त एका संघटनेने दिली होती - बेस्ट प्रशासन

- कृती समितीला काही सुचवायचं असेल तर पुन्हा जैसे थे परिस्थती होईल -कामगार संघटनांचे वकील

- कामगार संघटनांच्या नेत्यांनी कोर्टात हजर राहायला हवं - हायकोर्ट

- तुम्ही त्यांना जाऊन पूर्ण चित्र काय आहे ते सांगा - हायकोर्टानं कामगार संघटनांच्या वकिलांना सांगितलं

- कामगार संघटनांनी आज 6 वाजेपर्यंत संप मागे घेण्याचा निर्णय घ्यावा - मनपा आणि बेस्ट

- अशी घाई करुन निर्णय घेता येणार नाही - कामगार संघटना

- संप मागे घेण्याचा निर्णय तुम्ही आज घ्या आणि आम्हाला अधिकृतरित्या उद्या कळवला तरी चालेल - हायकोर्ट

- उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा सुनावणी घेण्यात यावी - कामगार संघटनेची मागणी


=================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2019 05:40 PM IST

ताज्या बातम्या