09 आॅक्टोबर : मुंबईमध्ये बेस्टनं वीजचोरीवर कडक कारवाई करायला सुरुवात केलीय आणि याचे परिणामही दिसू लागलेत. धारावी आणि अँटॉप हिल परिसरात गेल्या आठवड्यात मोठी कारवाई झाली. त्यामुळे वीजचोर आणि वीजमाफियांचे धाबे दणाणलेत. या कारवाईमुळे बेस्टची वीजगळती 7 टक्क्यांपेक्षाही कमी झालीय, ज्यामुळे नुकसान कोट्यवधी रुपयांनी कमी झालंय.
4 ऑक्टोबरला धारावीतल्या कुट्टीवाडी भागात मोठ्या प्रमाणावर कापड उद्योग चालतो. त्या भागात कारवाई करताना 21 वीजचोर आणि वीजमाफियांवर गुन्हे दाखल झालेत. एकट्या कुट्टीवाडीत 45 लाखांची वीजचोरी उघड झाली. बेस्ट दक्षता विभागाचे प्रमुख आर जे सिंग यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली.
7 ऑक्टोबरला संगम नगर झोपडपट्टीत पुन्हा सिंग यांच्या पथकानं कारवाई केली. त्यात 35 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 90 अधिकारी सहभागी होते. वीजचोरांना कळल्यावर त्यांनी पथकावर सोडाच्या बाटल्या फेकल्या आणि पळण्याचा प्रयत्न केला. पण बेस्टच्या पथकानं कारवाई पूर्ण केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा