तिसऱ्या दिवशीही बेस्टचा संप कायम, आता तोडगा काढण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची

तिसऱ्या दिवशीही बेस्टचा संप कायम, आता तोडगा काढण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची

मनसेने मात्र बेस्टच्या संपाला पाठिंबा दिला आहे. यावेळी 'संप मिटवण्यासाठी बेस्ट स्थानकात आरती करावी' अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जानेवारी : सलग तिसऱ्या दिवशीही बेस्टचा संप कायम आहे. त्यामुळे याचा सामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. यावर आता तोडगा काढण्यासाठी कृती समितीची बेस्ट भवनात सकाळी ९ वाजता बैठक होणार आहे. शशांक राव यांच्या कृती समितीबरोबर बेस्टचे जनरल मॅनेजर सुरेंद्रकुमार यांची बैठक होणार आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्ट बंद आहेत. बुधवारी दिवसभर कामगार संघटना आणि प्रशासनामध्ये बेस्ट कर्चमाऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठका होत राहिल्या मात्र त्यात काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशीदेखील मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बस धावणार नाहीत.

बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार आहेत. आज उद्धव ठाकरे संपासंदर्भात बैठक घेणार आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे बेस्ट कर्मचाऱ्यांना काय आश्वासन देणार आणि संपावर कशा प्रकारे तोडगा काढणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

तर एकीकडे, बेस्ट कामगार संघटनेचे सचिव शशांक राव यांनी बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांना होणाऱ्या त्रासासाठी शिवसेनेला जबाबदार धरलं आहे. तसंच मुख्य तीन मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार बोलून दाखवला.

'मेस्मा' कायद्यांतंर्गत कर्मचाऱ्यांना वसाहतीतील घरे रिकामी करण्याच्या नोटिसा धाडण्यामुळं बेस्ट कर्मचाऱ्यांमधील रोष कमालीचा वाढला आहे. नोटीस बजावण्याच्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी भोईवाडा वसाहतीतील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय वडाळा आगारावर मोर्चा नेणार आहेत.

दुसरीकडे, भाजपनंही मुख्यमंत्र्यांना बेस्ट संपाप्रकरणी लक्ष घालण्यासाठी गळ घातली आहे. संपाबाबत तोडगा काढून श्रेय घेण्यासाठी आता शिवसेना-भाजपमध्ये लढाई होण्याची शक्यता आहे.

दरम्या, एका बाजूला बेस्टच्या बंदमुळे मुंबईकर हैराण झालेले असताना स्वत: परिवहन मंत्री दिवाकर रावते मुंबईच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अव्वाच्या सव्वा भाडं आकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांवर कारवाई केली.

मनसेने मात्र बेस्टच्या संपाला पाठिंबा दिला आहे. यावेळी 'संप मिटवण्यासाठी बेस्ट स्थानकात आरती करावी' अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली आहे. तसंच पालिका आयुक्तांना बेस्ट बस एमएमआरडीएच्या घशात घालायची आहे आणि याला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा आरोप मनसेनं केला आहे.


VIDEO : ...म्हणून ‘ठाकरे’ सिनेमात या सीनवेळी भावुक झाला नवाजुद्दीन


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 08:32 AM IST

ताज्या बातम्या