• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • कोरोना व्हायरसमुळे आता मंत्रालयाचं कामकाज चालणार WhatsApp आणि SMSच्या माध्यमातून

कोरोना व्हायरसमुळे आता मंत्रालयाचं कामकाज चालणार WhatsApp आणि SMSच्या माध्यमातून

गर्दी कमी करणे आणि व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी घरातूनच कामकाज करण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

 • Share this:
  मुंबई 5 जून: कोरोना व्हायरसमुळे सगळ्याच स्तरावर मोठे बदल झाले आहेत. अनेक नियम बदलण्यात येत असून सगळ्या कामकाजाची दिशाच बदलूव गेली आहे. महाराष्ट्राचं कामकाज चालतं ते मंत्रालयातून मात्र मुंबईत कोरोनाचा प्रकोप असल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांना आता घरातूनच कामकाज करण्यास सांगण्यात आलंय. त्यामुळे शासकीय ई मेल सोबतच WhatsApp आणि SMSच्या माध्यमातून कामकाजी परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश काढण्यात आला असून सर्व विभागांना तो कळविण्यात आला आहे. गर्दी कमी करणे आणि व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी घरातूनच कामकाज करण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. आत्तापर्यंत ई मेल शिवाय WhatsApp आणि SMSच्या माध्यमातून माहितीचं आदान प्रदान होत असलं तरी ते अधिकृत मानलं जात नव्हतं. मात्र बदली परिस्थिती लक्षात घेऊन त्याला मान्यता देण्यात आलीय. अधिकारी आता घरी बसून प्रस्ताव तयार करणं आणि ते वरिष्ठांना मान्यतेसाठी पाठवणं हे WhatsApp आणि SMSच्या माध्यमातूनही करू शकतात. शासकीय ई मेलद्वारे प्रस्ताव पाठवल्यावर त्याची माहिती संबंधितांना WhatsApp आणि SMSच्या माध्यमातून कळवावी असंही सांगण्यात आलं आहे. या संबंधात सरकारी आदेश निघाल्याने कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळणार असून कामकाजालाही वेग येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्याची आठवड्यातून किमान एक दिवस तरी कार्यालयात उपस्थिती अनिवार्य असल्याचं या आदेशात म्हटलं आहे. तरी एखादी कर्मचारी ड्युटीवर हजर झाला नाही तर त्या कर्मचाऱ्याची गैरहजेरी लावून त्याचा पगार कपात करावा, असेही आदेशात स्पष्ट म्हटलं आहे. हेही वाचा - कोरोनाबाधितांची लूट, अव्वाच्या सव्वा बिल आकारणारे हॉस्पिटल सरकारच्या रडारवर राज्य सरकारनं यापूर्वी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाच टक्क्यांपर्यंत आणली होती. पण, आता राज्य सरकारने यासंदर्भात नव्याने एक आदेश काढला आहे. राज्य सरकारने शासकीय कर्मचारी यांना आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात उपस्थिती अनिवार्य केली आहे. सध्या जे संकट आहे, अशा काळात किमान आठवड्यातून एक दिवस तरी रोटेशन पद्धतीने कर्मचाऱ्यांना काम देण्यात यावे. एखादा कर्मचारी असे रोटेशन पद्धतीने आठवड्यातून किमान एक दिवस तरी कार्यालयात आला नाही तर संपूर्ण आठवडाभर त्याची अनुपस्थिती गृहीत धरून पगार देण्यात येऊ नये असे, या आदेशात म्हटले आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published: