मुंबई 19 नोव्हेंबर: राज्यातल्या ठाकरे सरकारच्या डोक्यात हवा गेली असून सत्तेची मस्ती आली आहे. ज्यांच्या डोक्यात सत्ता जाते ही फार काळ टिकत नाही, अशी चौफेर टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांवर पलटवार केलाय. भाजपच्या डोक्यात सत्ता गेल्यामुळे त्यांना मस्ती आली होती आणि त्यामुळेच राज्यात सत्तांतर झालं आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
पाटील म्हणाले, आमच्या सरकारमध्ये कोणालाही मस्ती आलेली नाही. एक वर्षापूर्वी जेव्हा सत्तांतर झाले, त्या सत्तांतराला एक कारण हेच होते. आमच्यात कोणीही मस्तवाल झालेलं नाही.
राज्यात महाविकास आघाडी एकत्र आहे हे पाहता मुंबई पालिकेसाठी तिन्ही पक्ष एकत्र येणं अभिप्रेत आहे. पण निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे. त्यामुळे चर्चा करून निर्णय घेऊ.
काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर बोलताना ते म्हणाले, निवडणुकीसाठीची चर्चा अजून सुरु करायची आहे त्यावर अजून भाष्य करु नये. काँग्रेसच्या मंत्र्यांच्या विभागाला निधी कमी मिळतो हे चुकीचं आहे. कोरोना काळात ज्या विभागांना प्राधान्यानं निधी देण्याची गरज आहे त्यांना निधी दिला जातोय असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते फडणवीस?
राज्यातल्या ठाकरे सरकारच्या डोक्यात हवा गेली असून सत्तेची मस्ती आली आहे. ज्यांच्या डोक्यात सत्ता जाते ही फार काळ टिकत नाही, महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरलं आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2022 मध्ये मुंबई सत्ता बदलायची आहे. 2017 मध्ये सत्ता बदलू शकलो असतो पण आम्ही दोस्ती निभावली, असा टोला देखील फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
फडणवीस म्हणाले की, आम्ही आधी टीका करत नव्हतो. मात्र आता भ्रष्टाचारची लक्तरे टांगल्याशिवाय राहणार नाहीत.
कोरोनाच्या नावाने कोणाला कंत्राट द्यायचे याची चिंता होती. हे सर्व उघड केल्याशिवाय राहणार नाही. वीज बिल माफीच्या घोषणेवर घुमजाव केले, गरीबाशी केलेला विश्वासघात आहे हा, गरिबांची थट्टा केली आहे. बदल्या करा माल कमवा, कशा प्रकारे बदल्यांचा बाजार यांनी मांडला आहे. हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.