मुंबई 04 जुलै : बहुमत चाचणीमध्ये शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला १६४ मतं मिळाली. तर महाविकास आघाडीला केवळ ९९ मतं मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. यानंतर सभागृहामध्ये बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं अभिनंदन केलं. यानंतर त्यांनी फडवणीसांना टोलाही लगावला. फडणवीसांचं कामच त्यांना अडचणी आणत असल्याचं ते म्हणाले.
'मी पुन्हा आलो आणि आता बदला घेणार, पण...', देवेंद्र फडणवीसांची सभागृहात टोलेबाजी
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणायचे की त्यांनी खूप चांगलं काम केलं. मात्र, कदाचित त्यांचं कामच त्यांना अडचणीत आणत आहे. मी पुन्हा येणार असं ते म्हणायचे, मात्र देवेंद्रजी असे येतील, असं वाटलं नव्हतं, असा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावला आहे.
यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करत त्यांचं कौतुकही केलं. एकनाथ शिंदेचा प्रवास अभूतपूर्व आहे. त्यांचा अवाका अतिशय मोठा आहे, असंही ते म्हणाले. सेनेच्या पुढाकारानेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं. आम्ही तर आधीच विरोधी पक्षात बसण्याची तयारी केली होती. मात्र, हे सरकार स्थापन झालं. तीन पक्ष एकत्र काम करतात, तेव्हा थोडा गोंधळ होणं सहाजिक आहे. मात्र, सरकारने अडीच वर्षात अतिशय चांगल्या प्रकारे सगळं हाताळलं, असंही ते म्हणाले. विजेचं संकट असो किंवा राज्यातील कोरोना संकट असो, सरकारने सगळं अगदी व्यवस्थित हाताळलं, असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे शिवसैनिक असल्याचं सारखं का सांगावं लागतंय? अजितदादांनी फटकारलं
याशिवाय अजित पवार यांनीही फडणवीसांना टोला लगावला आहे. फडणवीस सगळ्यात नशीबवान आमदार आहेत. अडीच वर्षात ते सगळ्या पदांवर बसले. अडीच वर्षात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते सगळं झाले, असा टोला अजित पवारांनी लगावला. 106 आमदार असणारी व्यक्ती उपमुख्यमंत्री होते आणि ४० आमदार असणारी मुख्यमंत्री होते, यात काहीतरी काळंबेरं आहे हे नक्की, असंही अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.