मुंबई, 16 जून: शिवसेना भवनासमोर (Shiv Sena Bhavan) आज शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पहायला मिळालं. हा वाद इतका वाढला की, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पोलीस स्टेशन गाठत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रारही दिली. शिवसेना आणि भाजप यांच्या झालेल्या या राड्यानंतर आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल (Balasaheb Thackeray speech video viral) होत आहे.
व्हायरल होणारी क्लिप 24 सेकंदांची असून त्या भाषणात बाळासाहेब म्हणत आहेत, "कारण नसताना तुमच्या कानफटात मारल्यानंतर तुम्ही म्हणाल वा छान मस्त बसली आणखी जोरात मारायला हवी होती, इतका भोळसटपणा बरा नाही. त्याचा फटकन आवाज आल्यानंतर काडकण आपला आवाज आला पाहिजे, तो शिवसैनिक. नुकत्या टाळ्या मारण्यासाठी हात नकोयत कानफटात मारण्यासाठी तो तयार ठेवा."
बाळासाहेबांच्या भाषणाचा Video व्हायरल होतोय pic.twitter.com/4MgtDgxW9e
— News18Lokmat (@News18lokmat) June 16, 2021
'कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार' - किशोरी पेडणेकर
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, "मला खरंच माहिती नाहीये नेमकं काय झालं आहे? शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी डिवचण्याचा कुणी प्रयत्न करणार असतील तर त्या पद्धतीने शिवसैनिक प्रत्युत्तर देणार आणि त्याचा हा भाग असेल. सत्तेत आहोत नक्कीच याची जबाबदारी आहे. पण उगाचच काही करणार असेल, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
'शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली'; आशिष शेलारांचा घणाघात
आशिष शेलार यांनी म्हटलं, युवा मोर्चाचे आमचे प्रतिनिधी पोलिसांना सूचना देऊन करत होते. लपून-छपून पोलिसांच्या आड राहून एका महिलेवर हल्ला करत शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.
आशिष शेलार यांनी पुढे म्हटलं, लपून छपून पोलिसांच्या आड राहून हल्ले कसले करताय. रणांगणात समोर या भारतीय जनता पार्टी तुम्हाला चारी मुंड्या चित करण्यासाठी तयार आहे. या भ्याड हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. महिला कार्यकर्त्यावर हल्ला करत शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. हिंदीत एक म्हण आहे लातो के भूत बातों से नही मानते त्यामुळे यापुढे चर्चेने चालणार नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.