मुंबई, 17 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन (Balasaheb Thackeray Memorial Day) आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातील लाखो शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करत आहे. पण, गेल्या कित्येक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकाचा मुद्दावरून मनसेचे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.
संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट करून आज पुन्हा एकदा शिवसेनावर हल्लाबोल केला आहे. देशपांडे यांनी महापौर बंगल्याचा फोटो शेअर केला असून 'स्मारक की मातोश्री 3?' असा खोचक सवाल थेट सेनेला विचारला आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्मारकाचं गणेशपूजन करण्यात आले होते. मुंबईतील महापौर बंगल्याची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीकडे हस्तांतरण करण्यात आले होते.
आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी स्मारकाचा मुद्दा उपस्थितीत करून सेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. सोमवारी सुद्धा संदीप देशपांडे यांनी 'महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता "राजसाहेब ठाकरे (Raj Thackery), कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28' असं म्हणत शिवसेनेला डिवचलं होतं.
समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता "श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28
कोरोनाच्या काळात गेल्या सर्वच उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद होते. पण, हळूहळू बाजारापेठा, उद्योग धंदे सुरू करण्यात येत होते. पण, राज्य सरकारकडून अनेक व्यवसायांना सुरू करण्यास मनाई केली होती. या काळात जीम संघटना असो अथवा मासे विक्रेते असो, सर्व संघटनांनी राज ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या 'कृष्णकुंज'वर जाऊन आपली व्यथा राज यांच्याकडे मांडली होती. त्यामुळे संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून 'समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता "राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28' असं म्हणत टोला लगावला होता.