मुंबई, 07 जानेवारी : औरंगाबाद नामांतराचा वाद शिगेला पोहोचला आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर व्हावे या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं असताना आता मनसेनंही या वादात उडी घेतली आहे. मनसेनं या मुद्द्यावरून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.
'जो पर्यंत सत्तेची लाचारी शिवसेना सोडत नाही तोपर्यंत नामांतर करू शकत नाहीत. सत्तेत असताना शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. या मुद्द्याला काँग्रेस पाठिंबा देणार नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनेला सत्तेत राहाणं जमणार नाही. त्यामुळे आता शिवसेनेनं ठरवायचं आहे. लाचारी करायची की अस्मिता बाळगून औरंगाबादचं संभाजीनगर नाव करायचं', अशी जहरी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करलेली आहे त्यामुळे शिवसेनेला लाचारी सोडल्याशिवाय नामांतर करता येणार नाही. शिवसेनेने ठरवायचे आहे की त्यांना लाचारी पत्करून सत्तेत राहायचं आहे की अस्मिता बाळगून नामांतरण करायचे आहे. काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याशिवाय त्यांनाही नामांतर करता येणार नाही. असा घणाघात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर व्हावे, ही शिवसेनेची जुनीच मागणी असली, तरी महाविकास आघाडीत सत्तेत असताना महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा चांगलाच रंगला आहे. संभाजीनगर या नामकरणाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे.