वेश्यागमनासाठी आलेल्या ग्राहकाचा वारांगनावर हल्ला, प्रियकराच्या डोक्यात घातला वरवंटा

वेश्यागमनासाठी आलेल्या ग्राहकाचा वारांगनावर हल्ला, प्रियकराच्या डोक्यात घातला वरवंटा

वेश्यावस्तीत प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या वारांगनावर दागिने व पैश्यांच्या हव्यासापोटी जीवघेणा हल्ला करून तिच्या प्रियकराला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली समोर आली

  • Share this:

रवी शिंदे,(प्रतिनिधी)

भिवंडी,12 डिसेंबर: वेश्यावस्तीत प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या वारांगनावर दागिने व पैश्यांच्या हव्यासापोटी जीवघेणा हल्ला करून तिच्या प्रियकराला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली समोर आली आहे. खळबळजनक म्हणजे वेश्यागमनाच्या बहाण्याने तिच्या घरी थांबलेल्या ग्राहकानेच त्याच्या दोन साथीदारांसह वारांगनाच्या प्रियकराच्या  डोक्यात वरवंटाच्या प्रहार करून त्याला जागीच ठार मारले. या घटनेत वारंगना गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी हल्लेखोर लुटारू त्रिकुटाला बेड्या ठोकल्या आहेत. काशिनाथ नायक (50) असे मृत प्रियकराचे नाव असून अनुसया (45) असे जखमी वारंगनाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, ही घटना शहरातील हनुमान टेकडी परिसरातील वेश्यावस्तीत एका घरात 5 डिसेंबर रोजी घडली होती. कासीम उर्फ शहनेशाह रशीद अली शेख (वय-29, रा.रामेश्वर मंदिर जवळ, भिवंडी) व त्याची साथीदार शिवानी रवी राठोड (30) आणि तृतीयपंथी फिरोज उर्फ फिरोजा अब्दुल अजीम शेख (30) असे गजाआड केलेल्या आरोपींची नावे आहेत.               भिवंडी शहरातील आसबीबी या रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची वस्ती असून याच वस्तीत एका घरात मृत काशिनाथ व अनुसया हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 6 डिसेंबरला उशिरापर्यंत सकाळी त्यापैकी कोणीही घराबाहेर न आल्याने शेजारी राहणारी चंद्रकला हेगडे या महिलेने दरवाजा लोटून त्यांच्या घरात डोकावण्याचा प्रयत्न केला असता घरात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यामुळे या घटनेने संपूर्ण वेश्यावस्तीत खळबळ उडाली होती. त्यानंतर स्थानिकांनी भिवंडी शहर पोलिसांना घटनेची खबर देताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमी अवस्थेत असलेल्या अनुसया हिला उपचाराकरता ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवले तर मृतक काशिनाथ याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना करून अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. घटनेच्या रात्री आरोपी महिला व तृतीयपंथी हे दोघे परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हातात पिशवी घेऊन जात असताना दिसून आले. पोलिसांनी त्यांच्यावर संशय व्यक्त करत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र दोन्ही आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना जखमी अनुसयाने कर्नाटक, वैजापूर या गावी जत्रेला जाण्यासाठी तिने सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी करून काही रोख रक्कम जमा केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तिन्ही आरोपींनी आपसात संगमात करून 5 डिसेंबरच्या रात्री दागिने व रोख रक्कम लुटण्याचा कट रचून ठरल्याप्रमाणे आरोपी कासीम हा अनुसया हिच्यासोबत वेश्यागमन करण्याच्या बहाण्याने त्या रात्री तिच्या घरी येऊन थांबला होता. त्यावेळी सोबत त्याने मद्याच्या बाटल्या आणि जेवणही आणले होते.आरोपी कासीमने अनुसयासोबत मद्यप्राशन करून त्याने झोपेचे नाटक केले.तोपर्यत अनुसयाही नशेत असल्याने तिलाही  झोप लागली.तर त्याच घरात दुसऱ्या पंलगावर मृतक काशिनाथ झोपला होता. 6 डिसेंबरला पहाटेच्या सुमारास आरोपीचे साथीदार महिला व तृतीयपंथी यांनी अनुसयाच्या घरात दागिने व रोख रक्कम लुटण्यासाठी प्रवेश केला. हे तिन्ही आरोपी घरात ठेवलेले दागिने शोधत असतानाच मृत काशिनाथ यास जाग आली. त्यामुळे कासीम याने घरातील दगडी वरवंट्याने त्याच्या डोक्यात प्रहार करून त्याला ठार मारले. तर अनुसयालाही जाग आल्याने तिच्याही डोक्यात त्याच वरवंट्याने डोक्यात प्रहार करून गंभीर जखमी करून घरातील दागिने आणि रोख रक्कम पळवली होती. दरम्यान तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून यातील कासीम हा पोलीस रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या तिन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 12, 2019, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading