मुंबई, 10 मे : विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधून काँग्रेसकडून सहावा उमेदवार मैदानात उतरवण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे मध्यरात्री काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी रात्री उशिरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या खास निरोप घेऊन थोरात यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. थोरात यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी रात्री उशिरा नार्वेकर भेट घेत ठाकरे यांचा निरोप दिला.
हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये आणखी एक भीषण अपघात, ट्रकमधून लपून घरी जाणाऱ्या 5 लोकांचा मृत्यू
विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांची आग्रही भूमिका आहे. मात्र, काँग्रेस दुसरा उमेदवार लढवण्यावर ठाम आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने दुसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी नार्वेकर यांनी भेट घेतल्याचं समजतं. या भेटी दरम्यान, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा ही झाल्याची माहिती मिळत आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर थोरातांनी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचं नाव जाहीर केलं.
प्रदेश काँग्रेसचे सचिव असलेले राजेश राठोड हे काँग्रेस पक्षाचा तरुण चेहरा आहे तर बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. हे दोनही उमेदवार बहुमताने विजयी होतील, याची मला खात्री आहे, असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला.
हेही वाचा - मुंबईत रहिवासी चाळ कोसळली, 5-6 नागरिक दबल्याची शक्यता
परंतु, काँग्रेसने सहावा उमेदवार उभा केल्यामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून बाळासाहेब थोरात यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसने जर उमेदवार मागे घेतला तर निवडणूक ही बिनविरोध होईल, अशीच मागणी शिवसेनेची आहे.
भाजपकडून कोण आहे मैदानात?
दरम्यान, भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांना डावललं आहे. भाजपकडून विधानपरिषदेसाठी यावेळी नवीन नेत्यांना संधी दिली आहे. डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
संपादन - सचिन साळवे