मुख्यमंत्र्यांचा सन्मान म्हणून निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, भाजप नेत्याचा सूर!

मुख्यमंत्र्यांचा सन्मान म्हणून निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, भाजप नेत्याचा सूर!

'निवडणुका बिनविरोध करणे ही विरोधी पक्षाची जबाबदारी हा जावई शोध लावू नका'

  • Share this:

मुंबई, 10 मे :  विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या या वादात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उडी घेत काँग्रेसला टोला लगावला आहे.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करून काँग्रेसला टोला लगावला आहे.  'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सन्मान आणि राज्यातील परिस्थिती पाहता निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात!  ती जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे', असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे.

तसंच, 'आम्ही आमच्या मतांप्रमाणे उमेदवार दिले आहेत. काँग्रेस ऐकत नाही यावरून आघाडीत जो बेबनाव सुरू आहे त्यामध्ये आम्हाला ओढू नका, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

तसंच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मतांची टक्केवारी पाहत भाजपनेही बिनविरोध निवडणुका होण्यासाठी विचार केला पाहिजे, अशी भूमिका मांडली होती.

त्यांच्या भूमिकेवर शेलार यांनी भाष्य करत राऊतांना टोला लगावला आहे. 'महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष तुमचा ऐकत नसेल आणि आडमुठी भूमिका घेत असेल तर त्याचे बोट आमच्याकडे दाखवू नका', असा टोला शेलारांनी राऊत यांना लगावला.

उद्धव ठाकरे काँग्रेसवर नाराज

काँग्रेसने विधान परिषदेसाठी दोन उमेदवार लढवण्याचा हट्ट केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने आता तातडीने बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा इशारा दिल्यानंतर काँग्रेसने तातडीने बैठक बोलावली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे अशोक चव्हाण, नितीन राऊत यांच्यासह काही नेत्यांशी चर्चा करणार आहे. काँग्रेस हायकमांड मात्र, काँग्रेस पक्षाने दुसरी जागा लढवावी, असा आदेश दिला आहे. त्यामुळे  या बैठकीमध्ये चर्चा केल्यानंतर काँग्रेस नेते त्यांची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवणार आहे.

'निवडणूक बिनविरोध व्हावी'

विशेष म्हणजे, विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आग्रही आहेत. मात्र, तरी देखील काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. आता   उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे काँग्रेसकडून यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी जाहीर?

तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित झालं आहे. तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

हेही वाचा -शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत संभाजीराजे छत्रपतींची महत्त्वपूर्ण घोषणा

तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांना  उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांच्या नावाची घोषणा खुद्द दिल्लीतून करण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब थोरातांनी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचं नाव जाहीर केलं आहे.

भाजपकडून कोण आहे मैदानात?

दरम्यान, भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांना डावललं आहे.  भाजपकडून विधानपरिषदेसाठी यावेळी नवीन नेत्यांना संधी दिली आहे. डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 10, 2020, 4:46 PM IST

ताज्या बातम्या