Home /News /mumbai /

Aslam Shaikh : टिपू सुलतान नामांतराला भाजपचा विरोध, मुंबईत प्रचंड गदारोळ, अस्लम शेख यांची पहिली प्रतिक्रिया

Aslam Shaikh : टिपू सुलतान नामांतराला भाजपचा विरोध, मुंबईत प्रचंड गदारोळ, अस्लम शेख यांची पहिली प्रतिक्रिया

"आदित्य ठाकरे आणि मी मुंबईचं रुप पालटायचं ठरवलं तेव्हापासून विरोधकांच्या पोटात पुटशूळ उठतंय. भाजपला इतकं लाचार मी कधी बघितलं नाही", असं अस्लम शेख म्हणाले.

    मुंबई, 26 जानेवारी : मुंबईच्या मालाड (Malad) येथील क्रिडा संकुल आणि उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला भाजपने (BJP) प्रचंड विरोध केला आहे. विशेष म्हणजे मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा कार्यक्रम आज पार पडणार होता. पण भाजप (BJP), विश्व हिंदू परिषद (VHP), बजरंग दल (Bajrang Dal) यांनी आक्षेप घेत मैदानाबाहेर प्रचंड मोठं आंदोलन केलं. शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी मोठा गदारोळ बघायला मिळाला. अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून वाहतूक कोंडी (Traffic) निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आणि खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी (Mumbai Police) यावेळी कार्यकर्त्यांची धरपकड केली. तसेच पोलिसांनी अतुल भातखळकर आणि गोपाळ शेट्टी यांना ताब्यात घेतलं. या सगळ्या गदारोळादरम्यान मुंबचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या हस्ते मैदानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मैदानाच्या नामांतराचा कार्यक्रम आज झाला नाही, असं स्पष्ट केलं. 'मी टिपू सुलतान यांचा समर्थक', अस्लम शेख यांची प्रतिक्रिया "ब्रिटशांविरोधात लढत-लढत ज्यांनी आपला जीव दिला ते वीर टिपू सुलतान होते. मैदानात नव्या गोष्टी काय येतील, ते शोधा. या मैदानात मुले कसे खेळतील, काय नवं असेल ते बघा. मी एकच विनंती करतो. तुम्ही नाव नका बघा, तुम्ही कामं बघा. या मैदानाला तर कोणी बघायलाही आलं नव्हतं. सर्व कचरा या मैदानात भरला होता. मैदानात झोपड्या होत्या. कचरा टाकला जात होता. मी टिपू सुलतान यांचं समर्थन करणारा व्यक्ती आहे. या मैदानात मी जे इन्फ्रास्ट्रक्टर केलं त्याची ओपनिंग होती", असं अस्लम शेख यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले? दरम्यान, नामांतराच्या या वादावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. टिपू सुलतान उद्यानाबाबत कुठलाही प्रस्ताव पालिकेकडे नाही. टिपू सुलतान हे नामकरण झालेलं नाही. या मैदानाचं अधिकृतरित्या नामकरण झालेलं नाही. हा अधिकार मुंबई महापालिकेचा आहे. नाव मुंबई महापालिका ठरवेल, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेबाबत अस्लम शेख यांना विचारलं असता आपण या मैदानाचं उद्घाटन केलं, असं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं. (Mumbai Building Collapsed : वांद्र्यात मोठी दुर्घटना, चार मजली इमारत कोसळली, 15 जखमी) अस्लम शेख यांची प्रतिक्रिया "आदित्य ठाकरे आणि मी मुंबईचं रुप पालटायचं ठरवलं तेव्हापासून विरोधकांच्या पोटात पुटशूळ उठतंय. भाजपला इतकं लाचार मी कधी बघितलं नाही. मालाड, मालवणीत देशप्रेम असणारेच राहतात. हे मैदान सर्वधर्मीयांसाठी खुले आहे. या मैदानाचं मी लोकार्पण केलं आहे", असं अस्लम शेख म्हणाले. "विरोधी पक्षनेते यांनीही नामकरण होऊ देणार नाही हे सांगितलं. ज्या नगरसेवकानं टिपू सुलतान या नावाचा प्रस्ताव दिला त्याचा राजीनामा आधी घ्या. मग त्यांना मी मानेल. हे नाव नियमानुसार आहे. टिपू सुलतान हिंदुस्थानी आहेत. भाजपच्या माजी महापौरांनी टिपू सुलतान हे नाव दिलं. खेळ लोकांना जोडतो. निवडणूक आली म्हणून भाजपने हा वाद काढला आहे. भाजपचे आताचे एक आमदार आधी नगरसेवक होते. त्यांनी टिपू सुलतान या नावाचा प्रस्ताव दिला होता आणि तो मंजूर झाला", अशी भूमिका अस्लम शेख यांनी मांडली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या