19 मार्च : राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात सरकारवर घणाघाती टीका केली. त्यामुळे आता भाजपचे नेतेमंडळीही सरसावलीयत. आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. ज्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने रोजगार मुक्त केलं त्यांनी मोदीमुक्त देशाची मुक्ताफळं उधळलीयेत.महाराष्ट्राची विधानसभा मनसेमुक्त झाली. उरलेसुरले नगरसेवक पळून गेले आणि मुंबई महापालिकाही मनसेमुक्त झालीये.
पूर्वी राज ठाकरेंच्या भाषणात बाळासाहेबांचा प्रभाव दिसायचा पण आता त्यांच्या भाषणात शरद पवारांचा प्रभाव दिसतोय. त्यामुळे महाराष्ट्राची जनता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या पाडवा मेळाव्यात केंद्र आणि राज्य सरकारवर आपल्या खास शैलीत सडकून टीका केली. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती त्यानंतर लोकांनी त्यांना मतं दिलीत. आता गरज मोदीमुक्त भारताची असून त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून देशात काही महिन्यांमध्ये धार्मिक दंगली घडवल्या जातील असा घणाघाती आरोपही राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. आपल्या संपूर्ण भाषणात राज ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर पूर्णपणे मौन पाळलं.