मुंबई, 11 डिसेंबर : एमआयएमचे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांची आज सकाळी औरंगाबाद (Aurangabad) येथून निघालेली तिरंगा रॅली (Tiranga Rally) संध्याकाळी मुंबईत दाखल झाली. या रॅलीदरम्यान पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण अखेर एमआयएमची मुंबईत चांदिवली येथे रॅली पोहोचली. तिथे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांची भव्य सभा झाली. या सभेत भाषण करताना ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाची (Muslim Reservation) मागणी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) सडकून टीका केली.
"मुस्लीम आरक्षणासाठी आजची रॅली आयोजित करण्यात आली आहे. तिरंगा रॅली काढली म्हणून शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारला काय त्रास झाला की त्यांनी जागोजागी ही रॅली अडविण्याचा प्रयत्न केला. मला या गोष्टीची खंत वाटतेय. शिवसेना 24 तासात राष्ट्रवाद म्हणून दोन हजारवेळा घोषणा करते तीच शिवसेना तिरंगा हाच आपला राष्ट्रवाद आहे हे कसं विसरते? तिरंगाच आपल्या देशाची ओळख आहे. या तिरंग्याचा इतका का देश वाटतो? तुम्हाला मुसलमानांचा द्वेश असू शकतो, पण तिरंगा उचलल्यावर द्वेश वाटतो. तिरंगा भारताची ओळख, आमच्या प्रेमाची निशाणी आहे, तसेत आमच्या पूर्वजांच्या आहुतींचा सन्मान आहे", असं ओवेसी म्हणाले.
हेही वाचा : अखेर मुंबईत झाली MIM ची सभा, जलील यांनी ठाकरे सरकारला विचारला थेट सवाल
काँग्रेसचे नेते राहुल गांधी या महिन्यात मुंबईचा दौरा करणार आहेत. त्या मुद्द्यावरुन त्यांनी महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारला. "रॅलीचा कार्यक्रमाची आयोजित केला म्हणून जमावबंदी लागू केली. आम्ही ठाकरे सरकारला विचारु इच्छितो, या डिसेंबर महिन्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष जे अमेठीतून पराभूत झाले आणि केरळमधून निवडून आले ते मुंबईत येणार आहेत. तेव्हाही कलम 144 लागणार की त्यांचं फुलांनी स्वागत करणार? तेव्हा ओमायक्रोन राहणार नाही?", असा सवाल ओवेसी यांनी केले.
"मुस्लीम आरक्षणाच्या नावावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक वक्तव्य केले होते. मुंब्राचे आमदार तर म्हणाले की, आमच्या तोंडाचं जेवण उचललं. त्यानंतर आमच्या महाराष्ट्राचा निर्मळ मुसलमान खूश झाला. ते आमचं जेवण परत करण्याबद्दल बोलत आहेत. त्यासाठी आम्ही उपाशी राहून त्यांना मतदान केलं. पण जेव्हा जिंकून आले तेव्हा त्यांना मुसलमान दिसत नाहीत. आता टेबलवर तीन लोक दाबून खात आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे कोण आहेत ते माहिती नाही. यांना जेवण देण्यासाठी तुम्ही उपाशी राहिलात. आपल्या मुलांबाळांचा विचार नाही केलात. आता बघा बसून कोण दाबून खात आहे", असा घणाघात ओवेसी यांनी केला.
हेही वाचा : 'अखेर मी मुंबईला आलोय, सभा घेणारच', इम्तियाज जलील यांचं राज्य सरकारला आव्हान
"तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मतदान केलं होतं. मी मुंबईत जेव्हा रॅलीत आलो होतो तेव्हा त्यांनी मला मेसेज करुन येऊ नका असं सांगितलं. तुम्ही आलात तर मत वाटले जातील, असं म्हटलं. आम्ही शिवसेना आणि भाजपला रोखू, असं ते म्हणाले होते. मी त्यांना म्हणालेलो की, तुम्ही भाजप-शिवसेनेला रोखू शकत नाहीत. ते तसंच झालं. पण आज अखेर राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेसोबत गेले. आता किती दिवस मुसलमानची फसवणूक व्हावी?", असा सवाल त्यांनी केला.
"बाबरी मशिद पाडल्यानंतर जो रस्त्यावर रक्तपाताची होळी खेळली गेली त्याने तुमचे डोळे उघडतील. पण त्यांनी आमच्या तरुणांना अटक करुन जेलमध्ये सडवलं. त्यांच्या तरुणपणाला तिथेच बरबाद केलं. इथल्या राजकारणावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तुम्ही विसरलात की प्रत्येक निवडणुकीत सेक्युलरीझमची भाषणं केली गेली. त्यातून काय मिळालं? त्यापासून आरक्षण मिळालं का? सेक्युलरीझममुळे मशिद पाडणाऱ्यांना शिक्षा झाली का? नाही मिळाली. सेक्युलरीझमच्या दाव्यावर मुसलमानाला न्याय मिळाला नाही. मी संविधानाच्या सेक्युलरीझमला मानतो. पॉलिटिकल सेक्युलरीझमला मानत नाही", असं ओवेसी म्हणाले.
"मुंबई हायकोर्टाने सांगितलंय की, महाराष्ट्रात मुसलमानांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. कारण ते सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत. पण हे महाविकास आघाडी सरकार ते विसरलं. ते मराठा आरक्षणाची गोष्ट करतात. महाराष्ट्रात किती मुस्लिम पदवीपर्यंतचं शिक्षण घेतात? 30 टक्के देखील नाहीत. महाराष्ट्रात फक्त 4.9 टक्के मुस्लीम सुशिक्षित आहेत. 25 टक्के मुसलमान वर्षाला 25200 कमवतात. 3 लाख 60 हजार वर्षाला कमाई करणारे शून्य टक्के आहेत. मराठ्यांची वार्षिक कमाई आकडेवारी मात्र वेगळी आहे. कमाईमध्ये मराठ्यांची कमाई खूप जास्त आहे. मराठा IAS अधिकारी अनेक, मुसलमान एकही नाही. मंत्रालयात मराठा 28 टक्के आहेत. मराठा आणि मुसलमान समाजात मोठी तफावत आहे. तरीही मराठ्यांना आरक्षण आणि मुसलमान मात्र वंचित", अशी भूमिका त्यांनी मांडली.
"मुसलमानला शिक्षण घ्यायचं आहे. पण हे संघ परीवाराचे लोक खोटं बोलत आहेत की, मुसलमानला शिकायची इच्छा नाही. मुसलमान का शिकू शकत नाही? कारण त्याच्याकडे त्यासाठी पैसे नाहीत", असं ओवेसी म्हणाले, तसेच "शिवसेना सेक्युलर नाही. उद्धव ठाकरे म्हणतात की बाबरी मस्जिद पाडणाऱ्यांवर आम्हाला गर्व आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार यांना हे चालतं का ? काँग्रेस काही दिवसात नामशेष होईल", असा घणाघात ओवेसी यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.