प्रशांत बाग, प्रतिनिधी
मुंबई, 26 मे : सॅम डिसुझाला दिलासा द्यायला नकार दिल्यानं समीर वानखेडेंविरोधात दाखल गुन्ह्यात CBI ला पहिलं यश मिळाल्याचं मानलं जातंय. सॅम अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात जाणार असला तरी सॅमवर CBI चौकशीची टांगती तलवार आहे. दरम्यान, सॅमनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत NCB चे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हवालामार्फत लाच स्वीकारल्याचा खळबळजनक आरोप केलाय.
कॉर्डिंलिया क्रूझवरील कथित आर्यन खान ड्रग प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय. त्यातच NCB मधील अंतर्गत कलह उघड झाल्यानं तत्कालीन NCB अधिकारी समीर वानखेडे हे CBI च्या रडारवर आलेत. सॅम हा सुद्धा CBI नं दाखल केलेल्या गुन्ह्यातील एक आरोपी आहे. सॅमलाही CBI नं चौकशीचं समन्स बजावल्यानं संरक्षण मागण्यासाठी सॅमनं हायकोर्टात धाव घेतली होती, पण कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे.
NCB चे तत्कालिन उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यावर सॅमनं दाखल केलेल्या याचिकेत गंभीर आरोप केले. ज्ञानेश्वर सिंग आणि व्ही व्ही सिंग यांना 14 लाख रुपये लाच दिल्याचा दावा सॅमनं केला होता. हे आरोप अत्यंत गंभीर असले तरी कोर्टानं कोणतंही म्हणणं ऐकून नं घेत डिसुझाला मोठी चपराक दिली.
समीर वानखेडे हे डेकोरेटिव्ह अधिकारी असल्याचं म्हणत कोर्टानं एकप्रकारे त्यांना संरक्षण दिलंय, तर सॅम हा खाजगी व्यक्ती असल्यानं त्याला मात्र फटकार लगावली आहे.
आता CBI ला सॅमची चौकशी करण्यात असलेली अडचण दूर झाली आहे. चौकशीत समीर वानखेडे अनेक मुद्द्यांवर टाळाटाळ करतायत असा CBI नं यापूर्वीच कोर्टात दावा केलाय. सॅमच्या चौकशीत काही धक्कादायक माहिती उघड झाली तर CBI सॅमला अटकही करू शकते, तसं झालं तर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.