उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत तर शिवसेनेचे 'हे' दोन नेते आहेत दावेदार

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत तर शिवसेनेचे 'हे' दोन नेते आहेत दावेदार

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं तर तो इतिहास ठरणार असून ठाकरे घराण्याची व्यक्ती पहिल्यांदाच अश्या मोठ्या पदावर येणार आहे.

  • Share this:

मुंबई 21 नोव्हेंबर : शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत झाल्याने आता चर्चेचा केंद्रबिंदू शिवसेनेत राहणार आहेत. मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यावर या दोनही पक्षांचं एकमत झाल्याने शिवसेनेसाठी तो मोठा दिलासा ठरणार आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपद हे अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं जाणार का हे अजुन गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता शिवसेनेत घडामोडींना वेग येणार असून शुक्रवारच्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं होतं.

पण आता परिस्थिती बदलल्याने उद्धव ठाकरे यांचं नाव शिवसेनेत घेतलं जातंय. आदित्य हे तरुण आहेत त्यांनी थोडा अनुभव घेतला पाहिजे असा सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचं बोललं जातंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं असा आग्रह शिवसेना नेत्यांनी धरलाय. उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे आणि उद्धव यांचे विश्वासू सुभाष देसाई यांचंही नाव आघाडीवर आहे.

सत्तास्थापनेचं केंद्र दिल्लीतून मुंबईत, काँग्रेसच्या नेत्यांसाठी विशेष विमान

एकनाथ शिंदे हे मोठं जनसमर्थन असलेले नेते आहेत. ठाण्यात त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहेत ही त्यांची बलस्थानं असली तरी त्याच गोष्टी त्यांच्या विरोधातही जावू शकतात. तर सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहेत. ते त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही याची पूर्ण खात्री मातोश्रीला असल्याने त्यांचं नावही पुढे येवू शकते. मात्र त्यांना इतर नेते आणि आमदारांचं कितपत सहकार्य मिळू शकते याविषयी शंका व्यक्त केली जातेय. त्यामुळे पुढचे काही दिवस हे शिवसेनेत घडामोडींचे राहणार असून पक्षासाठी ते निर्णायक ठरणार आहेत. त्यातच सेनेच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये स्पर्धा असल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर इतर नेत्यांमध्ये नाराजी राहणार नाही अशीही भावना आहे.

उद्या मुंबईत बैठकांचा सपाटा

महाराष्ट्रातल्या सत्तेचा पेच सोडविण्यासाठी गेली काही दिवस दिल्लीत बैठकांचा रतीब सुरू होता. सगळ्या घडामोडींचं केंद्र हे राजधानी दिल्ली झालं होतं. त्याचं कारण म्हणजे सगळी चर्चा ही सोनिया गांधींभोवती फिरत होती. शिवसेनेसोबत काँग्रेसने यावं यावं यासाठी सगळेच ज्येष्ठ नेते बैठकांवर बैठका करत होते. त्यातच संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने शरद पवारही दिल्लीतच होते. त्यामुळे सर्व घडामोडी दिल्लीतच केंद्रीत झाल्या होत्या. या बैठकांमध्ये काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्यास मान्यता दिली आणि सत्तेचा नवा फॉर्म्युलाही तयार झाला. आता चर्चेच्या फेऱ्या या शिवसेनेसोबत होणार असल्याने उद्यापासून (शुक्रवार 22 नोव्हेंबर) सगळी चर्चा मुंबईत होणार आहे.

महाविकास आघाडीचं ठरलं, असा आहे सत्तेचा नवा फॉर्म्युला!

काँग्रेसने आपल्या वाट्याला येणाऱ्या 11 मंत्र्यांचाही निर्णय घेतला आहे. संभाव्य मंत्र्यांची यादीही तयार करण्यात आलीय. नेत्यांना तातडीने मुंबईत जाता यावं यासाठी काँग्रेसने एक चार्टड विमानही बुक केलं असून ते दिल्ली विमानतळावर तयार ठेवण्यात आलंय. हे विमान नेत्यांना मुंबईत जाण्यासाठी वापरलं जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 06:06 PM IST

ताज्या बातम्या