मुंबई, 04 जून : अंमली पदार्थांच्या (Drugs) एका मोठ्या प्रकरणात मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला (Mumbai Police Anti Narcotics Cell) यश मिळालं आहे. पथकानं एका 50 वर्षीय महिलेला मोठ्या प्रमाणावर अंमलीपदार्थांसह (Woman Drugs supplier) अटक केली आहे. महिलेकडून अंमली पदार्थ विरोधी पथकानं तब्बल तीन कोटी आठ लाख दहा हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. ही महिला देशातली अंमली पदार्थांची सर्वात मोठी सप्लायर असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
(वाचा-अशा फ्रेंड रिक्वेस्टपासून सावधान! जाळ्यात अडकवून करतायेत न्यूड व्हिडिओ चॅट, मग..)
अंमली पदार्थांचा एवढा मोठा साठा असलेल्या या महिलेला मुंबईतील प्रसिद्ध आणि हायप्रोफाईल अशा काळबादेवी परिसरातून अटक करण्यात आली आहे. ही महिला परिसरामध्ये एखाद्या साधारण गृहिणीसारखी वावरत होती. पण तिच्याबाबत मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी कारवाई केली. अटक केली तेव्हा महिलेकडं 1 किलो 27 ग्रॅम हेरॉइन होतं. महाराष्ट्राच्या बाहेरून महिलेला मोठ्या अंमलीपदार्थांचा पुरवठा होत असल्याचंही समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय टोळीशीही तिचे संबंध असल्याची चर्चा आहे. त्यामुळं अंमली पदार्थ तस्करीची पाळंमुळं कुठपर्यंत रुतली आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.
(वाचा-महिलेने 16 वर्षांच्या मुलाचे केले लैंगिक शोषण;खुलाशानंतर पतीकडून 1 लाखांची मागणी)
पोलिसांनी अटक केलेल्या महिलेला अंमली पदार्थ तस्करीच्या टोळ्यांमध्ये दरारा होता, असं सांगितलं जातं. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे अशा मोठ्या शहरांत तस्करांना ती अंमली पदार्थांचा पुरवठा करत होती. अंमली पदार्थविरोधी पथकाच्या मते, या महिलेचे राजकीय संबंध अशून तिच्यावर मोठा वरदहस्त अशल्याचीही शक्यता आहे. तिच्यावर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 कलम 8 कलम 21 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांसह अंमली पदार्थ विरोधी पथकातील सदस्यांचं यासाठी कौतुक केलं जात आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये अंमली पदार्थ तस्करांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या. केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाया होत होत्या. त्यामुळं मुंबई पोलिसांचं अंमली पदार्थ विरोधी पथक काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र या कारवाईनंतर अशा चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Drugs, Mumbai, Mumbai police