'त्या' दिवशी गृहमंत्री क्वारंटाइन असल्याचा पवारांचा दावा, विमानप्रवासाचे तिकिट समोर आल्याने नवा ट्वीस्ट
'त्या' दिवशी गृहमंत्री क्वारंटाइन असल्याचा पवारांचा दावा, विमानप्रवासाचे तिकिट समोर आल्याने नवा ट्वीस्ट
15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुखांनी विमानप्रवास केल्याचा पुरावा देणारं एक तिकिट समोर आलं आहे. गृहमंत्र्यांना कोरोना (Coronavirus) झाल्यानंतर ते गृह विलीगिकरणात होते असा दावा शरद पवार यांनी केला होता.
मुंबई, 23 मार्च: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी लिहिलेले पत्र, त्यामधील महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांचा (Anil Deshmukh) यांचा उल्लेख, त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण आणि शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेली पाठराखण या सर्व घटनांमुळे गेल्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. दरम्यान रोज नवे ट्वीस्ट या प्रकरणामध्ये येत आहे. दरम्यान 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुखांनी विमानप्रवास केल्याचा पुरावा देणारं एक तिकिट समोर आलं आहे.
गृहमंत्र्यांना कोरोना (Coronavirus) झाल्यानंतर ते गृह विलीगिकरणात होते असा दावा शरद पवार यांनी केला होता. त्यामुळे वाझे भेट कशी शक्य होती? असा सवालही पवारांनी विचारला होता. दरम्यान आता नागपूरवरून स्पेशल चार्टर विमानाने गृहमंत्री अनिल देशमुख मुंबईस आल्याचे तिकीट समोर आल्याने अजून एक नवीन ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
मात्र अनिल देशमुखांनी एक व्हिडीओ ट्वीट करत फेब्रुवारी महिन्यात काय काय घडले याचा एक घटनाक्रमच सांगितला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 04 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान ते नागपूरच्या रुग्णालयामध्ये भरती होते. त्यांनंतर 15 फेब्रुवारी रोजी मुंबईला जाण्यासाठी विमानप्रवास केला. त्यानंतर ते त्यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानी क्वारंटाइन होते असल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला आहे. या क्वारंटाइन काळात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काही बैठका, कार्यक्रमांना हजेरी लावल्याचंही ते म्हणाले. अनिल देशमुखांनी असे स्पष्टीकरण दिले आहे की त्यांनी पहिल्यांदा 28 फेब्रुवारी रोजी घर सोडले.
काय म्हणाले होते शरद पवार?
शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्या पत्रावर नव्याने भूमिका मांडली. 'अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू आहे. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचे जे पत्र लिहिले होते. त्यामुळे सचिन वाझेंना भेटायला बोलावलं असा दावा करण्यात आला आहे. पण त्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला देशमुख हे रुग्णालयात दाखल होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत. त्यानंतर 27 फेब्रुवारीपर्यंत ते क्वारंटाइन होते. त्याच दिवशी ते वाझे यांना भेटले असल्याचा दावा करण्यात आला होता. जेव्हा चौकशी होईल तेव्हा सत्य बाहेर येईल', असं पवार स्पष्ट केले.
'जे ही आरोप झाले त्यामध्ये मुख्य प्रकरण काय आहे. कोणाच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्यात आले हे प्रकरण आहे. माजी पोलीस आयुक्ताला हे सर्व माहीत होते तर एक महिने का शांत होते, असा सवाल पवारांनी केली. दरम्यान आजही या प्रकरणावरून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठका होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा, परमबीर सिंग यांची याचिका इ. बाबींवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.