मुंबई 5 फेब्रुवारी : नक्षलवादांशी संबंध असल्याचा आरोप असलेले आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुराता दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयानं आनंद तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. दरम्यान, तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीनाला राज्य सरकारनं विरोध दर्शवला आहे. तर, उत्तर दाखल करण्यासाठी देखील सरकारनं वेळ मागितला असून पुढील सुनावणी 11 फेब्रुवारी होणार आहे.
यापूर्वी देखील पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना मुंबई विमानतळावरून अटक केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयानं पुणे पोलिसांना चपराक लगावत आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर ठरवली होती. याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं 12 फेब्रुवारीपर्यंत आनंद तेलतुंबडे यांना अटकेपासून संरक्षण दिले होते.
भीमा कोरेगार प्रकरण आणि आनंद तेलतुंबडे
31 डिसेंबर 2017 रोजी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी काही विचारवंत आणि लेखकांना ऑगस्ट 2018मध्ये अटक झाली होती. या अटकसत्रा दरम्यान आनंद तेलतुंबडे यांच्या घरावर देखील धाड टाकण्यात आली होती. यावेळी आनंद तेलतुंबडे मुंबईमध्ये होते. दरम्यान, कोणताही वॉरंट नसताना पोलिसांनी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये घराची झडती घेतल्याचा आरोप तेलतुंबडे यांनी केला होता.