मुंबई, 24 डिसेंबर : लॉकडाऊनमध्ये अधिकतर व्यवहार आणि काम ऑनलाइन होत (Online Transaction) आहेत. दरम्यान ऑनलाइन गैरव्यवहाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ऑनलाइन व्यवहार करताना फसवणुकीचे प्रकार झाल्याचे अनेक गुन्हे समोर आलेत. नवी मुंबईतही (Navi Mumbai Online fraud) असाच एक ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा समोर आला आहे. परिणामी नवी मुंबईतील नेरुळ येथे राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याला एक पिझ्झा तब्बल 50 हजारांना पडलाय.
नेरूळ सेक्टर 6 येधील मेरिडीयन सोसायटीत विष्णू व रोमी श्रीवास्तव हे दोघेच राहतात. विष्णू यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्याने घरात स्वयंपाक करता येणार नाही, म्हणून बाहेरुनच जेवण मागविण्याच्या दृष्टीने त्यांनी पिझ्झाची ऑर्डर दिली. पिझ्झाची ऑर्डर (Online Pizza Order) देत असताना त्यांना एक फोन आला. फोनवर 5 रुपये भरण्याचं सांगितलं व त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातून सलग पाच वेळा 10 हजारांचे व्यवहार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुढचे संपर्क टाळले.
आयुष्याची जमापुंजी पीएमसी बँक घोटाळ्यात (PMC Bank Fraud) अडकल्यानंतर त्यांनी दुसऱ्या बँक खात्यात निवृत्तीवेतनाचे एक लाख रुपये साठवले होते. त्यातल्या 50 हजारांवर अज्ञाताने डल्ला मारल्याने त्यांच्यासमोर भविष्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वृद्ध दाम्पत्याने संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी नेरुळ पोलीस स्थानकात धाव घेतली असता पोलिसांनी गुन्हा दाखल न करता उडवाउडवीची उत्तर देत या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वृद्ध दाम्पत्याने केला आहे. मात्र या ऑनलाइन फ्रॉडमुळे या वृद्ध दाम्पत्याला पुढील दिवस कसे काढायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.